प्रतिनिधी/ सातारा
विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग आजपासुन (बुधवार दि. 16) संपावर जाणार आहेत. त्यामुळे जिल्हय़ातील दिडहजार मेट्रीक टन माल हा गोदामात बंद राहणार आहे. संबंधीत कर्मचारी वर्ग हे बेमुदत संपावर जाणार असल्याने सातारा जिल्हय़ातील शासकीय धान्य, शेतकरी-व्यापारी शेतीमाल, दूध पावडर, बी-बियाणे, खते आदी वितरण व्यवस्था ठप्प होणार आहे. कर्मचाऱयांनी पुकारलेल्या या आंदोलनामुळे धान्याचा तुटवडा निर्माण होण्याची ही शक्यता आहे.
सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणी करीता महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, मार्केटींग फेडरेशन, वनविकास महामंडळ व पश्चिम महाराष्ट्र औद्यागिक विकास मंडळातील अधिकारी आणि कर्मचारी वर्ग हे संपावर जाणार आहेत. या अंतर्गत एकत्रित कृती समितीची स्थापना ही करण्यात आली आहे. वखार महामंडळ हे शासकीय धान्य वितरण व्यवस्थेतील मुख्य घटक आहे. येथे तांदूळ व गहू साठा साठवून त्याची जिल्हा वितरण व्यवस्थेमाफंत रेशनकार्डावर धान्य वितरीत होते. शेतकऱयांचे शासकीय हमीभावाने खरेदी केले धान्य, कडधान्य व गळीतधान्य व्यवस्था केली जाते. तसेच शेतकऱयांच्या इतर धान्यांची साठवणूक ही होते.
जिल्हय़ातील गोदामातील शिल्लक माल-मेट्रीक टनमध्ये-
सातारा ‘क’चार-22,800(शासकीय गहू, तांदूळ व शेतकरी-व्यापारी शेतीमाल)
सातारा ‘ड’पाच-7810(रासायनीक खते, शेतकरी-व्यापारी शेतीमाल)
कराड-12,045 (रासायनिक खते, शेतकरी-व्यापरी शेतीमाल)
कोरेगाव-2160 (शेतकरी-व्यापारी शेतीमाल)
वाई-7,600(शासकीय गहू, तांदूळ व शेतकरी व्यापारी शेतीमाल)
फलटण-8920(शेतकरी-व्यापारी शेतीमाल व गोविंद दूध पावडर)
जळगाव(सातारा)-13,860 (शासकीय गहू व तांदूळ)
लोणंद-20440(शासकीय गहू, तांदूळ व शेतकरी व्यापारी शेतीमाल)
मागण्या त्वरीत मान्य कराव्यात
सातवा वेतन आयोग त्वरीत लागू करावा, वैद्यकीय भत्ता, ईनकॅशमेंट, रेग्युलेशन पिरियड आदी पाच मागण्यांकरीता आम्ही हा संप पुकारला आहे. तरी शासनाने आमच्या मागण्या त्वरीत मान्य कराव्यात.
आर.ए.गलांडे
साठाअधिक्षक महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ सातारा ‘ड’पाच
धान्यवितरण व्यवस्था बंद करण्यात आल्यामुळे याचा प्रामुख्याने परिणाम हा शेतकरी वर्गांवर होणार आहे. कारण शेतकऱयांच्या मालाची आवक-जावक पुर्णपणे बंद होणार. तसेच आत्ता खरीप हंगामा असल्याने खरतांची व बिनांची मागणी अधिक असते, त्यातच हा बेमुदत संप असल्याने याचा परिणामी धान्यांचा तुटवडा भासण्याची शक्तता आहे.