सहा महिन्यांच्या कालावधीनंतर काढता येणार पासपोर्ट
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेल्यामुळे मार्च महिन्यापासून बेळगाव पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्र अद्यापपर्यंत बंद ठेवण्यात आले होते. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. ज्यांना पासपोर्टची गरज आहे त्यांना हुबळी येथे जाऊन पासपोर्ट काढावा लागत होता. त्यामुळे बेळगावमधील पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याची मागणी वारंवार केली जात होती. अखेर ही मागणी पूर्ण झाली असून, सोमवार दि. 28 पासून पासपोर्ट सेवा केंद्र पुन्हा कार्यरत होत आहे.
कर्नाटकात एकूण 22 ठिकाणी पोस्ट ऑफीस पासपोर्ट सेवा केंद्रे आहेत. पोस्ट कार्यालयाच्या मदतीने या सर्व ठिकाणी पासपोर्ट सेवा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. बेळगावमध्येही कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालयाच्या आवारात हे सेवा केंद्र सुरू करण्यात आले होते. यामुळे बेळगावमधील नागरिकांना बेळगावमध्येच पासपोर्ट काढणे सहज शक्मय झाले होते. परंतु मार्च महिन्यात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हे कार्यालय बंद होते. मागील सहा महिन्यांपासून हे कार्यालय अद्याप बंद आहे.
राज्यातील इतर ठिकाणची पासपोर्ट केंद्रे सुरू केली असतानाही बेळगावमधील पासपोर्ट सेवा केंद्र बंद का? असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता. ज्या व्यक्तींना अर्जंट पासपोर्ट गरजेचा होता त्यांना हुबळी येथे जाऊन पासपोर्ट काढावा लागत होता. पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याची मागणी जोर धरू लागल्यामुळे अखेर सोमवारपासून पोस्ट कार्यालयातील नव्या जागेत हे कार्यालय खुले केले जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
दररोज 25 जणांना प्रवेश
लॉकडाऊननंतर सोमवार दि. 28 पासून पासपोर्ट सेवा केंद्र पुन्हा सुरू केले जात आहे. सामाजिक अंतर राखण्यासाठी दररोज केवळ 25 जणांनाच प्रवेश दिला जाणार आहे. नागरिकांनी सामाजिक अंतर राखत पासपोर्ट काढण्याचे आवाहन बेळगाव पोस्ट कार्यालयाचे अधीक्षक एस. डी. कुलकर्णी यांनी केले.