आज गुलबर्गा जिल्हय़ात येणार : विविध बैठक, कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार
प्रतिनिधी /बेंगळूर
नेतृत्व बदलाच्या मुद्दय़ावरून राज्य भाजपमध्ये निर्माण झालेला गोंधळ हायकमांडने दूर केला आहे. आता मुख्यमंत्रिपदाचे आसन आणखी मजबूत करण्याबरोबरच पक्षसंघटना बळकट करण्यासाठी येडियुराप्पा यांनी शनिवारपासून विविध जिल्हय़ांचा दौरा हाती घेतला आहे.
मागील काही महिन्यांपासून मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी जिल्हय़ांचा दौरा हाती घेतला नव्हता. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे त्यांनी प्रशासकीय कामकाजाला गती देण्याबरोबरच सरकारचे वर्चस्व अबाधित राखण्यासाठी जिल्हय़ांचा दौरा हाती घेतला आहे. शनिवारी ते गुलबर्गा जिल्हा दौऱयावर जाणार आहेत. प्रत्येक आठवडय़ात एका जिल्हय़ाला भेट देऊन तेथील विविध विकासकामांचा शुभारंभ, विकासकामांचा प्रगती आढावा आणि जिल्हा भाजप कार्यालयांना भेट देतील.
शनिवारी बेंगळूरच्या एचएएल विमानतळावरून ते विशेष विमानाने गुलबर्ग्याला जातील. सकाळी 11 वाजता कल्याण कर्नाटक प्रदेश विकास आणि गुलबर्गा नगरविकास प्राधिकरणाच्या अनुदानातून निर्माण होणाऱया नूतन भाजी मार्केटची कोनशिला बसवतील. नंतर सहकार खात्यामार्फत आयोजित शेतकऱयांना बिनव्याजी कर्जवितरण कार्यक्रमात सहभागी होतील. त्यानंतर गुलबर्गा जिल्हा भाजप कार्यालयाला भेट देऊन स्थानिक नेत्यांशी संवाद साधतील. सायंकाळी कोरोना नियंत्रणासंबंधी जिल्हा प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर बेंगळूरला परततील.