बेंगळूर, मुंबई, पुणे, अहमदाबाद, हैद्राबाद, म्हैसूर सेवा होणार सुरू
प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर 25 मेपासून देशांतर्गत विमानप्रवास करण्याचा निर्णय केंद्रीय नागरी हवाई मंत्रालयातर्फे घेण्यात आला होता. त्यामुळे बेळगावमधून विमानप्रवास सुरू करण्याबाबत तयारी करण्यात आली आहे. मागील दोन महिन्यांपासून शुकशुकाट असणारे विमानतळ सोमवारपासून गजबजणार आहे.
कोरोना रुग्णांची संख्या वाढताच विमानप्रवास थांबविण्यात आला होता. तब्बल दोन महिन्यांनी पुन्हा हा विमानप्रवास सुरू करण्यात येत आहे. देशांतर्गत विमान वाहतूक सुरू होणार आहे. बेळगावच्या सांबरा विमानतळावरून सेवा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी तिकिटांचे दरही नागरी हवाई मंत्रालयातर्फे निश्चित करण्यात आले आहेत. सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करून विमानप्रवास करता येणार आहे.
या शहरांना सुरू होणार विमानसेवा
सोमवारपासून बेंगळूर, मुंबई, पुणे, हैद्राबाद, अहमदाबाद, म्हैसूर या शहरांना विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. स्पाईस जेट, इंडिगो, स्टार अलायन्स व ट्रु जेट विमान कंपन्यांनी पुढाकार घेतला असून ही सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. स्टार एअरने बेंगळूर, अहमदाबाद, स्पाईस जेटने मुंबई व हैद्राबाद, ट्रू जेटने म्हैसूर, हैद्राबाद, अलायन्स एअरने पुणे, व इंडिगोने हैद्राबाद या सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
विमानतळ प्रशासन सज्ज
25 पासून विमानांची ये-जा सुरू होणार असल्याने विमानतळ प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. सोशल डिस्टन्सिंगची सर्व ती खबरदारी घेण्यात आली आहे. विमानतळाच्या प्रत्येक भागाचे सॅनिटायझेशन करण्यात येत आहे. टर्मिनलजवळ कोणत्याही प्रवाशांची वाहने येणार नसल्याने पार्किंगमध्ये वाहने लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांना बसण्यासाठी असणाऱया खुर्च्यांमध्येही सामाजिक अंतर ठेवण्यात येणार आहे.
मुंबई-पुण्याबाबत प्रवाशांमध्ये संभ्रम देशांतर्गत प्रवासी विमानसेवा 25 मेपासून सुरू करण्यात येईल, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली असली तरी महाराष्ट्रात सेवा सुरू न करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. त्यामुळे बेळगाववरून सुरू होत असणाऱया मुंबई व पुणे सेवेबाबत अद्याप प्रवाशांमध्ये संभ्रम आहे. बेळगाव विमानतळ प्रशासनाकडून सेवा सुरू होईल, असे सांगण्यात आले आह. मात्र, महाराष्ट्र सरकारने विमानसेवा बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगितल्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडत आहे