प्रतिनिधी/ बेंगळूर
जनतेला प्रतीक्षा असणारी कोरोनावरील लस अखेर राज्यात दाखल झाली असून 16 जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरणाला प्रारंभ होणार आहे. मंगळवारी पहिल्या टप्प्यात 6 लाख 48 हजार कोविशिल्ड लस राज्यासाठी उपलब्ध झाल्या आहेत. त्या कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवण्यात आल्या असून बुधवारपासून विविध जिल्हय़ांना पाठविण्यात येणार आहेत. लस अत्यंत सुरक्षित असून त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगण्याची आवश्यकता नाही, असे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सांगितले.
केंद्रीय औषध नियंत्रण संचालकांनी कोविशिल्ड लस खरेदीला मान्यता दिली आहे. त्यानुसार केंद्र सरकारने 1.1 कोटी लसीचे डोस खरेदी केले आहेत. त्याकरिता 231 कोटी रुपये खर्च झाले आहेत. कोविशिल्ड अत्यंत कमी दराने उपलब्ध झाली असून एका डोससाठी 210 रुपये खर्च आला आहे. त्यामध्ये जीएसटीचाही समावेश आहे, असे त्यांनी सांगितले. बेंगळूरच्या सदाशिवनगर येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
पहिल्या टप्प्यात कर्नाटकाला 13.90 लाख लसीचे डोस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. मंगळवारी त्यापैकी 6.48 लाख लसीचे डोस आले असून उर्वरित डोस दुसऱया टप्प्यात पाठविण्यात येणार आहेत. मंगळवारी सकाळी बेंगळूरच्या आनंदराव सर्कलमधील राज्य लससाठा गोदामामध्ये लसींचे बॉक्स आणण्यात आले आहेत. तेथून लसीकरण केंद्रांना वितरण केले जाणार आहे. एका लसीच्या बाटलीत 5 मि. ली. लस असून ती 10 जणांना देता येईल. प्रत्येकाला 0.5 मि. ली. लस देण्यात येणार आहे. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी पुन्हा दुसरा डोस घ्यावा लागणार आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून कोरोनाला प्रतिबंध घालण्याची क्षमता शरीरामध्ये निर्माण होईल. लस पुर्णतः सुरक्षित असून त्याचे कोणतीही दुष्परिणाम नाहीत, असे ते म्हणाले.
लसीकरणाची प्रक्रिया पारदर्शक होणार असून केंद्र सरकारच्या मार्गसूचीचे पालन केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 6 लाख जणांनी लसीसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी आरोग्य कर्मचारी आणि आघाडीच्या फळीतील कोरोना योद्धय़ांना मोफत लस दिली जाणार आहे, त्यानंतर 55 वर्षांवरील व्यक्ती आणि जोखमीचे आजार असणाऱया रुग्णांना लस दिली जाणार आहे.
पुण्याहून एकूण 54 बॉक्स बेंगळुरात
मंगळवारी सकाळी पुण्याच्या सिरम इन्स्टिटय़ूटकडून लसीचे बॉक्स स्पाईसजेट कंपनीच्या विमानातून बेंगळूरच्या देवनहळ्ळी येथील केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. एकूण 54 बॉक्समध्ये 6.48 लाख कोविशिल्ड लसींचे डोस उपलब्ध झाले आहेत. दुपारी 12.30 वाजता विमान लस घेऊन बेंगळुरात दाखल झाले. त्यानंतर आरोग्य खात्याच्या कंटेनरमधून लसींचे बॉक्स आनंदराव सर्कल येथील सरकारच्या कोल्ड स्टोअरेजमध्ये हलविण्यात आले. या लसी बुधवारपासून बेंगळूरसह राज्यातील इतर जिल्हय़ांना पाठविण्यात येणार आहे.