प्रतिनिधी/आजरा
गडहिंग्लज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी नरेंद्र मुतकेकर यांच्याकडेच आजरा नगरपंचायतीचा अतिरिक्त भार आहे. त्यामुळे आजरा नगरपंचायतीचे महिन्यातील निम्मे दिवसही काम सुरळीत होत नाही. यामुळे आजरा नगरपंचायतीला स्वतंत्र मुख्याधिकारी नेमण्याची मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना देण्यात आले आहे.
मुख्याधिकारी स्वतंत्र नसल्याने नगरपंचायतीच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. मासिक सभाही वेळेत होण्यात अडचणी येत आहेत. यामुळे शहराच्या विकास कामासह नागरीकांच्या नगरपंचायतीशी संबंधित असलेल्या दैनंदिन कामकाजातही दिरंगाई होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. शहरातील विकास कामांना गती मिळण्याबरोबरच नागरीकांची कामेही तातडीने व्हावीत यासाठी तातडीने आजरा नगरपंचायतीला मुख्याधिकारी देण्याची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देवणे यांची सही असून उपनगराध्यक्ष आलम नाईकवाडे, नगरसेवक संभाजी पाटील व देवणे यांनी हे निवेदन उपजिल्हाधिकाऱयांकडे दिले आहे.