जगातील सर्वात एकाकी हत्ती ‘कावन’ : कंबोडियात होणार रवानगी
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथील प्राणिसंग्रहालयात अत्यंत छोटय़ा जागेत ठेवण्यात आलेल्या हत्तीला आता मुक्त केले जाणार आहे. कावन नावाचा हा हत्ती 35 वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्थेत जगत होता. जगभरातील प्राणिप्रेमी त्याच्या मुक्ततेसाठी मोहीम चालवत होते. लोकांनी कावनला ‘जगातील सर्वात एकाकी हत्ती’ नाव दिले आहे. हा हत्ती आता कंबोडियात पाठविला जाण्याची शक्यता आहे. कंबोडियात हत्तींची निगा चांगल्याप्रकारे ठेवली जाते. कावनला तेथे आणखीन दोन साथीदार मिळणार आहेत.
‘फॉर पॉज’ या संस्थेचे प्रवक्ते मार्टिन बॉयर यांनी संबंधी माहिती दिली आहे. इस्लामाबादच्या वन्यजीव व्यवस्थापन मंडळाने हत्तीला अन्यत्र हलविण्याचे निर्देश दिले आहेत. त्याच्या स्थानांतरणासाठी वैद्यकीय अनुमती मिळाली आहे. शुक्रवारी हत्तीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती, या हत्तीची प्रकृती अत्यंत खराब असल्याचे बॉयर यांनी सांगितले आहे.
शरीरावर घाव, मानसिकदृष्टय़ाही आजारी
वैद्यकीय तपासणीत कावन हत्तीमध्ये कुपोषणाची लक्षणे आढळून आली आहेत. दीर्घकाळापर्यंत तो सिमेंटेड पृष्ठभागावर राहिल्याने त्याचे पाय खराब झाले आहेत, नखं तुटली असून शरीरार जखमा आहेत. तो मानसिकदृष्टय़ाही त्रस्त आहे, सतत डोकं हलवत राहतो. हा हत्ती बरा होण्यासाठी दीर्घ कालावधी लागणार आहे. परंतु तो अन्यत्र आणि चांगल्या ठिकाणी पाठविण्याच्या स्थितीत असल्याचे बॉयर म्हणाले. कावन याच्या साथीदाराचा 2012 मध्ये मृत्यू झाला होता. तेव्हापासून तो हलाखीच्या स्थितीत आणि एकटा राहत आहे.
अमेरिकेच्या गायिकेकडून दखल
कावनला वाचविण्यासाठी जगभरातील प्राणिप्रेमी सरसावले होते. अमेरिकन गायिका शॅर हिने हत्तीला मुक्त करण्याचे आवाहन केले होते. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने मे महिन्यात प्राणिसंग्रहालय बंद करण्याचे आदेशही दिले होत. प्राण्यांची निगा ठेवली जात नसल्याच्या अनेक तक्रारी मिळाल्याने हा आदेश देण्यात आला होता.
2 सिंहांचा मृत्यू
जुलै महिन्यात प्राणिसंग्रहालयातील दोन सिंहांना अन्यत्र नेताना निष्काळजीपणा बाळगण्यात आल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. सिंहांना पिंजऱयात कैद करण्यासाठी स्थानिक कर्मचाऱयांनी त्यांच्या पिंजऱयालाच आग लावली होती.