चीनमधील एक महिला स्वतःच्या आजीच्या भावनांवरून अत्यंत संवेदनशील होती, याचमुळे तिने 13 वर्षांपर्यंत एका महिलेला स्वतःच्या आईची भूमिका पार पाडण्यासाठी नेमले होते. आजीला तिच्या मुलीचा मृत्यू झाला हे कळू नये म्हणून तिच्या नातीने हे सर्व घडवून आणले आहे.
46 वर्षीय महिला चेंग जींग या चीनच्या शांक्सी प्रांतात राहतात. चेंग यांच्या आईचा फुफ्फुसांच्या कर्करोगामुळे वयाच्या 69 व्या वर्षी मृत्यू झाला होता. आजी भावनिकदृष्टय़ा स्वतःच्या मुलीच्या अत्यंत जवळ असल्याने चेंगने एका महिलेला नकली आई म्हणून भाडेतत्वावर नेमण्याचा निर्णय घेतला.
या महिलेचा आवाज चेंगच्या आईशी मिळताजुळता होता, चेंगची आजी चीनच्या शिचुआन प्रांता राहते, ती अनेकदा स्वतःच्या मुलीसोबत फोनवरून बोलायची, पण भाडेतत्वावर नेमलेल्या महिलेचा आवाज फोनवर ऐकल्यावर त्यांना मोठा संशय आला. पण चेंगने स्थिती सावरून घेत आईला सर्दी झाल्याने त्यांचा आवाज बसला असल्याचे सांगितले. चेंगशी बोलल्यावर आजीची समजूत पटली आणि ती या भाडेतत्वावरील महिलेला स्वतःची मुलगी मानून फोनवर बोलत राहिली.
चेंगची आजी या महिलेला अनेकदा घरी येण्यास सांगायची, पण महिला काहीतरी निमित्त पुढे करून घरी जाणे टाळत होती. माझ्या आजोबांचा मृत्यू आजी 30 वर्षांची असताना झाला होता. आजीला केवळ एकच अपत्य होते आणि ती म्हणजे माझी आई. माझ्या आईला आजीनेच लहानाचे मोठे केले होते. अनेकार्थाने त्यांच्या जीवनात केवळ माझी आजीच सर्वस्व होती असे चेंग सांगते.
मी माझ्या आईची देखभाल चांगल्याप्रकारे करू शकले नव्हते, याची मला खंत होती. याचमुळे आजीला कुठल्याही स्थितीत आनंदी ठेवण्याचा निर्धार केला. मला आजीशी खोटं बोलणं आवडत नाही, पण याशिवाय कुठलाच पर्याय माझ्यासमोर नव्हता असे चेंग हिने म्हटले आहे. चेंग यांच्या आजीचा वयाची शंभरी पार केल्यावर मृत्यू झाला. पण अखेरपर्यंत आपली मुलगी या जगात नसल्याची जाणीव त्यांना झाली नाही.