वार्ताहर / देवगड:
कशेडी घाटातील ट्रव्हल्स अपघातात मृत झालेला मूळ देवगड तालुक्यातील फणसगाव येथील साहील राजेंद्र राणे (8) हा आपल्या आजीसमवेत कासार्डे येथे आजोळी येत होता. तो आई- वडिलांचा एकुलता होता. त्याच्या निधनामुळे कासार्डे व फणसगाव येथे शोककळा पसरली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, साहीलचे आई-वडील कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास आहेत. त्याचे वडील मुंबईतील एका हॉटेलमध्ये कामास आहेत. तर आई परिचारिका आहे. त्यांचे मूळ घर फणसगाव येथे आहे. सणासुदीला हे कुटुंब गावी येत असे. साहील हा बुधवारी सायंकाळी खासगी ट्रव्हल्सने मुंबईहून कासार्डे येथे आपल्या आजोळी येत होता. मात्र, गुरुवारी पहाटेच्या सुमारास ट्रव्हलला कशेडी घाटात अपघात झाला. या अपघातात साखरझोपेत असणारा साहील हा घाटातील दरीतील झाडाला आदळला. यात तो जागीच ठार झाला. तर त्याच्या आजीला गंभीर दुखापत झाली. दरम्यान, या अपघाताची माहिती स्थानिक पोलिसांकडून साहीलच्या आई-वडिलांना देण्यात आली.