इयॉन मॉर्गन-महेंद्रसिंग धोनी आमनेसामने, आयपीएल फायनलमध्ये केकेआर-चेन्नई निर्णायक मुकाबला : धोनीचे नेतृत्व हेच चेन्नईचे ब्रह्मास्त्र, जेतेपद खेचून आणण्यासाठी मॉर्गनही सज्ज
वृत्तसंस्था /दुबई
तांत्रिकदृष्टय़ा सरस खेळ साकारत अंतिम फेरीपर्यंत धडक मारणाऱया कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आज आयपीएल फायनलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सचा संघ उभा ठाकेल, त्यावेळी धोनीचे करिष्माई नेतृत्व, हेच त्यांचे ब्रह्मास्त्र असणार आहे. या ब्रह्मास्त्राचा बीमोड करण्यासाठी केकेआरची भिस्त प्रामुख्याने त्यांच्या फिरकी त्रिकुटावर असेल. वर्ल्डकपमधील आजी-माजी विजेत्यात कोण सरस ठरणार, विजयाचे सोने कोणता संघ लुटणार, हे या निर्णायक लढतीत स्पष्ट होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, ही लढत सायंकाळी 7.30 वाजता खेळवली जाईल.
चेन्नई सुपरकिंग्सने आतापर्यंत खेळलेल्या 12 हंगामात फायनल गाठण्याची यंदाची ही नववी वेळ आहे. दोनवेळा ते निलंबित होते. यंदा केकेआरविरुद्ध हा संघ कागदावर सरस भासतो. मात्र, फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण यापैकी कोणत्याही आघाडीवर त्यांना गाफील राहून चालणार नाही, हे देखील तितकेच स्पष्ट आहे.
चेन्नईने आजवर खेळलेल्या 8 फायनलमध्ये 3 वेळा विजेतेपद मिळवले तर 5 वेळा त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे, केकेआरने दोनवेळा जेतेपद मिळवले असून या दोन्ही वेळा गौतम गंभीर कर्णधार होता.
यंदाचा केकेआर संघ अव्वल खेळाडूंच्या फॉर्ममुळे चेन्नईसमोर तगडे आव्हान उभे करण्यात यशस्वी ठरला तर त्यातही आश्चर्याचे कारण असणार नाही. 2012 मध्ये त्यांनी 190 धावांचा देखील अगदी यशस्वी पाठलाग केला होता, ते विसरुन चालणार नाही.
अय्यर-शकीबमुळे केकेआर समतोल
शकीब हसनच्या अष्टपैलू खेळामुळे केकेआरचा संघ अधिक समतोल ठरत आला असून त्याने आंद्रे रसेलची गैरहजेरी भासू दिलेली नाही. मात्र, येथे चेन्नईसारखा तगडा संघ समोर असल्याने त्यांचा खरा कस लागणार आहे. दोन्ही संघ दडपण हाताळण्यात किती यशस्वी होणार, यावर देखील बरीच समीकरणे अवलंबून असणार आहेत. अशा परिस्थितीत धोनीचे नेतृत्व मार्गदर्शक ठरु शकेल.
पुण्याच्या ऋतुराज गायकवाडला धोनीनेच पुढाकाराने संधी मिळवून दिली आणि यात धोनीची कल्पकता दिसून आली. ऋतुराजने देखील या संधीचा पुरेपूर लाभ घेत धडाकेबाज फलंदाजी साकारत स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले. ऋतुराजने यंदा 3 अर्धशतके झळकावली. आता धोनी आयपीएलमधून निवृत्त झाल्यानंतर ऋतुराजकडे मोठी जबाबदारी सोपवली गेली तर त्यातही आश्चर्याचे कारण नसेल. काही वर्षांपूर्वी सुरेश रैना चेन्नईसाठी जी भूमिका पार पाडत होता, तीच भूमिका आता ऋतुराज पार पाडत आहे.
‘ती’ 12 षटके कशी खेळणार, यावर बरीच समीकरणे अवलंबून!
या आयपीएल हंगामात मॉर्गनच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सची भिस्त प्रामुख्याने त्यांच्या फिरकी त्रिकुटावर राहिली असून आजचा दिवस देखील याला अपवाद नसेल. वरुण चक्रवर्ती (इकॉनॉमी रेट : 6.40), शकीब हसन (6.64) व सुनील नरेन (6.44) यांचा यात समावेश आहे. या तिघांची 12 षटके चेन्नईचे फलंदाज कसे खेळून काढणार, यावर बरीच समीकरणे अवलंबून असणार आहेत.
केकेआरच्या ट्रान्स्फॉर्मेशनसाठी मॉर्गन नव्याने सज्ज
इंग्लंडला 2019 चा वर्ल्डकप जिंकून देत संघात नव्याने जान भरण्यात यशस्वी ठरलेला इयॉन मॉर्गन आज आयपीएल फायनलमध्ये केकेआर संघासाठी देखील विजेतेपद खेचून आणण्यासाठी अनुभव पणाला लावेल. इंग्लंडसाठी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये जो करिष्मा साकारला, तोच आता केकेआरसाठी साकारणे, हे त्याचे मुख्य लक्ष्य असेल.
स्वतः मॉर्गन आतापर्यंत फलंदाजीत अपयशी ठरत आला असला तरी त्याने केलेले बदल संघाच्या पथ्यावरच पडत आले आहेत. शुभमन गिल काही वेळा अपयशी ठरला तरी मॉर्गनने त्याला सातत्याने संधी दिली आणि याचा लाभ गिलला सूर सापडण्यात झाला आहे. वेंकटेश अय्यरवर दाखवलेला भरवसा देखील केकेआरसाठी महत्त्वाचा ठरत आला आहे. धोनीप्रमाणेच मॉर्गन संयमी कर्णधार म्हणून ओळखला जातो. आपल्या भावना तो चेहऱयावर दर्शवत नाही. साहजिकच, या दोन्ही करिष्माई कर्णधारांमधील साडेतीन तासांची आजची लढाई विशेष लक्षवेधी ठरणार आहे.
सीएसकेचे अनुभवी खेळाडू करिष्मा साकारणार?
चेन्नईचे बहुतांशी खेळाडू ज्येष्ठतेकडे झुकणारे असून यामुळे त्यांना डॅडीज आर्मी म्हणून संबोधले जाते. धोनी 40 वर्षांचा असून ब्रेव्हो 38, प्लेसिस 37, अम्बाती रायुडू 36 वर्षांचा आहे. उत्थप्पा काही आठवडय़ात 36 वा वाढदिवस साजरा करेल तर मोईन अली 34 व रविंद्र जडेजा 32 वर्षांचा आहे. या ज्येष्ठ, अनुभवी खेळाडूंवर चेन्नईची मुख्य भिस्त असेल.