दोन्ही संघांतील बिग हिटर्सची जुगलबंदी रंगण्याची अपेक्षा
वृत्तसंस्था/ अबु धाबी
आयपीएलच्या तेराव्या मोसमातही पहिला सामना गमविण्याची परंपरा खंडित करता न आलेल्या मुंबई इंडियन्सची दुसरी लढत बुधवारी दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध होणार आहे. केकेआरची ही या मोसमातील पहिलीच लढत आहे. दोन्ही संघांत बिग हिटर्स असल्याने त्यांच्यातील द्वंद्व पहावयास मिळण्याची अपेक्षा आहे. सायंकाळी 7.30 पासून या सामन्याला सुरुवात होणार आहे.
2013 पासून मुंबई इंडियन्सला पहिला सामना एकदाही जिंकता आलेला नाही आणि यावेळीही त्यात बदल झाला नाही. चेन्नई सुपरकिंग्सने मुंबईच्या डावातील शेवटच्या दहा षटकांत सामन्यावर पकड मिळविली आणि नंतर 5 गडय़ांनी विजय मिळविला. त्यामुळे विजयाच्या मार्गावर येण्यासाठी मुंबईचे प्रयत्न असतील तर केकेआरही विजयी प्रारंभ करण्यास उत्सुक झाले आहे. दोन्ही संघांमध्ये मोठे फटके मारणारे फलंदाज असल्याने त्यांच्यातील जुगलबंदी पहावयास मिळण्याची अपेक्षा आहे. शुभमन गिलची ही तिसरी आयपीएल स्पर्धा असून नजाकतदार फटके आणि सहजतेने केलेली आक्रमक फटकेबाजी यांचे लक्षवेधी प्रदर्शन करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. एक्स्ट्रॉ कव्हरवरून तो षटकार खेचू शकतो आणि कव्हर्समधून हळुवार चौकारही वसुल करण्याची त्याची क्षमता आहे. याच गुणांच्या जोरावर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील एक महान खेळाडू बनला आहे. त्यामुळे रोहित विरुद्ध शुभमन अशी झुंज बुधवारी पाहता येईल.
टी-20 मध्ये फक्त नजाकतदार फटकेच आकर्षण असतात असे नव्हे, तर चेंडूला प्रेक्षकांत भिरकावून देणारी स्फोटक फलंदाजी ही या प्रकाराची स्पेशालिटी आहे. मुंबईचा हार्दिक पंडय़ा केकेआरच्या सुनील नरेन व कुलदीप यादवच्या फिरकीचा तसेच वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सचा समाचार घेण्यास सज्ज झाला आहे. प्रसिद्ध कृष्णा किंवा कमलेश नागरकोटी यापैकी एक दुसरा वेगवान गोलंदाज केकेआर संघात असेल. आंद्रे रसेल हा केकेआरकडे हार्दिक पंडय़ाची तोड असेल. सध्या टी-20 क्रिकेटमधील रसेल हा सर्वाधिक स्फोटक फलंदाज म्हणून ओळखला जातो. गेल्या वर्षी त्याला खालच्या क्रमांकावर खेळण्यास पाठविल्यामुळे त्याने संघव्यवस्थापनावर उघड टीका केली होती. केकेआरसाठी मागील मोसमही अत्यंत खराब गेला होता, पण त्यातही रसेलने तब्बल 52 षटकार ठोकले होते. यावेळी मात्र बढती देण्याचे त्याला वचन देण्यात आले असून यामुळे प्रतिस्पर्ध्यांच्या गोटात चिंतेचे वातावरण असू शकते. ‘तिसऱया क्रमांकावर येऊन त्याला समजा 60 चेंडू खेळावयास मिळाले तर तो कदाचित द्विशतकही नोंदवू शकेल. संघाला त्याचा फायदा होत असेल तर हा प्रयोग करण्यास काहीच हरकत नाही,’ असे या संघाचे मेंटर डेव्हिड हसी यांनी म्हटले आहे.
इंग्लंडचा वनडे कर्णधार इयॉन मॉर्गनने रसेलला पूरक साथ देण्याचे बोलून दाखविले असून कर्णधार दिनेश कार्तिकलाही त्याचा सल्ला मिळू शकतो. मात्र चारच विदेशी खेळाडूंना संघात स्थान द्यावे लागत असल्याने त्याचा संघात समावेश होईल का, हे पहावे लागेल. मुंबई संघात नाथन कोल्टर नाईल उपलब्ध झाला असून त्याच्यामुळे संघ जास्त समतोल होणार आहे.
संघ : मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंग, अनुकूल रॉय, ख्रिस लीन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पंडय़ा, इशान किशन, पॅटिन्सन, बुमराह, जयंद यादव, पोलार्ड, कृणाल पंडय़ा, मॅक्लेनाघन, मोहसिन खान, कोल्टर नाईल, प्रिन्स बलवंत राय, डी कॉक, राहुल चहर, सौरभ तिवारी, शेरफेन रुदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, बोल्ट.
कोलकाता नाईट रायडर्स : कार्तिक (कर्णधार), मॉर्गन, नितिश राणा, राहुल त्रिपाठी, रिंकू सिंग, शुभमन गिल, सिद्धेश लाड, अली खान, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्युसन, कमिन्स, प्रसिद्ध कृष्णा, संदीप वॉरियर, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, आंदे रसेल, ख्रिस ग्रीन, एम. सिद्धार्थ, सुनील नरेन, निखिल नाईक, टॉम बॅन्टन.
सामन्याची वेळ : सायं. 7.30 पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स