दिल्ली कॅपिटल्स व सनरायजर्स हैदराबादमध्ये तुंबळ रस्सीखेच अपेक्षित
अबु धाबी / वृत्तसंस्था
अगदी मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावत विजयरथावर स्वार होणाऱया सनरायजर्स हैदराबादची आज (दि. 8) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध दुसरी व शेवटची क्वॉलिफायर लढत होत असून याच लढतीच्या माध्यमातून फायनलमधील दुसरा मानकरी संघ कोणता असेल, हे निश्चित होईल.
यंदाच्या आयपीएल हंगामातील पहिल्या टप्प्यात सनरायजर्सची कामगिरी सर्वसाधारण स्वरुपाची होती. पण, नंतर दुसऱया टप्प्यात वॉर्नर धडाकेबाज फॉर्ममध्ये परतल्यानंतर हा संघही बहरात आला आणि त्यांनी धडाधड विजयाची मालिका सुरु करत प्ले-ऑफमधील स्थान निश्चित केले. वास्तविक, एलिमिनेटर लढतीत आव्हान संपुष्टात येण्याचा धोका असल्याने तेथे दडपण अधिक होते. पण, तेथेच हैदराबादचा खेळ अधिक बहरला आणि त्यांनी आरसीबीचे आव्हान संपुष्टात आणत दुसऱया क्वॉलिफायरमध्ये धडक मारली. त्यानंतर आता फायनलमध्ये पोहोचण्याचे लक्ष्य या संघासमोर असणार आहे.
दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सचा संघ पहिल्या 9 सामन्यातील आपल्या धडाकेबाज खेळाच्या बळावर जेतेपदाच्या प्रबळ दावेदारात गणला जात होता. या 9 पैकी 7 सामने त्यांनी जिंकले होते. पण, नंतर अचानक या संघाचा सूर हरवला आणि पुढील 6 पैकी 5 सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्याने ते अडचणीत आले. कर्णधार श्रेयस अय्यरवर दडपण वाढत राहिले. पण, पहिल्या 9 सामन्यातील 7 विजयांचे बळ त्यांच्यासाठी उपयुक्त ठरले आणि त्या बळावर ते प्ले-ऑफमध्ये कायम राहिले. अर्थात, मुंबई इंडियन्सने पहिल्या क्वॉलिफायरमध्ये त्यांना आणखी एक दे धक्का दिला आणि पुन्हा एकदा या संघासमोर दडपण झुगारुन नैसर्गिक खेळ साकारण्याचे आव्हान असणार आहे.
दिल्लीला विजयाची अपेक्षा करायची असेल तर युवा फलंदाज, कर्णधार अय्यरला स्वतः पुढाकाराने लढावे लागेल आणि त्याला सहकाऱयांची देखील पूरक साथ लाभणे महत्त्वाचे ठरणार आहे. सनरायजर्स हैदराबाद संघासाठी वॉर्नरचा फॉर्म विशेष महत्त्वाचा ठरेल. वॉर्नर 2016 मधील आयपीएल जेतेपदाचा साक्षीदार ठरला असून हा अनुभव हैदराबादसाठी उपयुक्त ठरु शकतो. अर्थात, पहिल्या तीन फलंदाजांपैकी पृथ्वी शॉ (13 सामन्यात 228) व अजिंक्य रहाणे (7 सामन्यात 111) यांचा खराब फॉर्म ही दिल्लीची मुख्य चिंता आहे. शिखर धवनने 15 सामन्यात 525 धावा जमवल्या असून पुन्हा एकदा त्याच्यावरच दिल्लीची भिस्त असणार आहे.
दिल्लीची गोलंदाजी मात्र भक्कम आहे कॅगिसो रबाडा (25 बळी), ऍनरिच नोर्त्जे (20), रविचंद्रन अश्विन (13) यांनी प्रतिस्पर्ध्यांना सातत्याने धक्के देण्यात कसर सोडलेली नाही आणि यापूर्वीच दडपणाखाली असलेल्या सनरायजर्सवर त्यांनी वर्चस्व गाजवले तर यात आश्चर्याचे कारण असणार नाही. साहा यापूर्वी एलिमिनेटर लढतीत खेळू शकला नव्हता. पण, येथे दुसऱया क्वॉलिफायर लढतीत त्याचा सहभाग अपेक्षित असल्याचे संकेत आहेत.
संभाव्य संघ
दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), कॅगिसो रबाडा, मार्कस स्टोईनिस, संदीप लामिछने, इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, शिमरॉन हेतमेयर, ऍलेक्स कॅरे, मोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ललित यादव, अवेश खान, अक्षर पटेल, तुषार देशपांडे, ऋषभ पंत, हर्षल पटेल, किमो पॉल, अमित मिश्रा, ऍनरिच नोर्त्जे, डॅनिएल सॅम्स.
सनरायजर्स हैदराबाद :
डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, केन विल्यम्सन, मनीष पांडे, श्रीवत्स गोस्वामी, विराट सिंग, प्रियम गर्ग, वृद्धिमान साहा, अब्दुल समद, विजय शंकर, मोहम्मद नबी, रशीद खान, जेसॉन होल्डर, अभिषेक शर्मा, बी. संदीप, संजय यादव, फॅबियन ऍलेन, पृथ्वी राज यार्रा, खलील अहमद, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, बिली स्टेनलेक, टी. नटराजन, बसिल थाम्पी.
सामन्याची वेळ : सायं. 7.30 पासून.
शून्यावर बाद होणारे फलंदाज ही दिल्ली कॅपिटल्सची चिंता!
यंदाच्या आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्सचे आघाडी फळीतील फलंदाज थोडय़ाथोडक्या नव्हे तर तब्बल 9 वेळा भोपळाही न फोडता, शून्यावर बाद झाले आहेत आणि ही दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक रिकी पाँटिंगची मुख्य चिंता आहे. या 9 मध्ये शिखर धवन 4 वेळा, पृथ्वी शॉ 3 वेळा तर अजिंक्य रहाणे 2 वेळा शून्यावर बाद झाले आहेत.