सकाळी साडेसहा वाजता देशाला उद्देशून वक्तव्य
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
‘आरोग्यासाठी योग’ या विषयावर सोमवारी सकाळी साडेसहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला उद्देशून वक्तव्य करतील, असे पंतप्रधान कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 21 जूनचा दिवस दरवर्षी जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यंदाचा हा सातवा योगदिन आहे.
जगात 80 देशांहून अधिक देशांमध्ये योगदिन साजरा करण्यात येतो. 2015 मध्ये केंद्रात भाजपचे प्रशासन स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या पुढाकाराने जागतिक योगदिन साजरा करण्याच्या प्रथेचा प्रारंभ झाला. या दिवशी प्रत्येक देशात अनेक स्थानी सामुहिक योगव्यायाम आणि योगासने करण्यात येतात. भारताच्या कानाकोपऱयातही हा दिन अशाच प्रकारे उत्साहात मानण्यात येतो. तथापि, 2020 मध्ये आणि यावर्षी तो कोरोनाचा जागतिक उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर साजरा करण्यात येत आहे. यंदा तो सामुहिकरित्या साजरा न करता प्रत्येकाने आपापल्या घरातच योगासने व इतर योगव्यायाम करून तो पाळावा, असे आवाहन पूर्वीच करण्यात आले आहे. सामुहिकरित्या तो साजरा करायचा असल्यास कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दूरदर्शनवर प्रसारण
पंतप्रधान मोदी यांच्या देशाला उद्देशून केलेल्या भाषणाचे प्रसारण दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून केले जाणार आहे. यानंतर आयुष विभागाचे केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांचेही भाषण प्रसारित केले जाईल. नंतर ‘मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थे’च्या वतीने योगासनांचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.
योगदिनाची सज्जता
योगदिन साजरा करण्यासाठी अनेक देशांनी तयारी केली आहे. आता अनेक देशांमधील कोरोना निर्बंध हटविण्यात आले असून अशा देशांमध्ये हा दिन उत्साहात साजरा होण्याची शक्यता आहे. युरोपमध्ये फ्रान्स, ब्रिटन, इटली, स्पेन, जर्मनी इत्यादी देशांमध्ये तो दरवर्षी साजरा होतोच. यंदा कोरोनाच्या नियमावलीचे पालन करून तो साजरा करण्यासाठी अनेक देश सज्ज होत आहेत.
भारतात निर्बंधांमध्येच
भारतात मात्र कोरोनाचा दुसरा उदेक निवळलेला असला तरी स्थिती पूर्वपदावर आलेली नाही. आज सोमवारपासूनच अनेक राज्यांनी निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सुरक्षितेची सर्व दक्षता घेऊन योगदिन साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरीकांनी प्रामुख्याने घरी राहूनच तो पाळावा, सार्वजनिक पद्धतीने पाळावयाचा असल्यास स्थानिक कोरोना नियमनांचे कसोशीने पालन अनिवार्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.