टीम कूक आणि मार्क झुकरबर्गही उपस्थित राहणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बुधवारी युरोपमधील सर्वात मोठा स्टार्टअप कार्यक्रम म्हणून गणल्या जाणाऱया ‘व्हिवा टेक 2021 ला संबोधित करतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला ऍपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कूक आणि फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग उपस्थित असतील. पंतप्रधान मोदींना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम आणि व्हिडीओ शॉपिंग यांचे प्रसारण सर्वसामान्यांसाठीही पेले जाईल. यासाठी जगभरातील मान्यवर नेते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असतील. यात फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन आणि स्पेनचे पंतप्रधान यांचा समावेश आहे. अनेक युरोपियन देशांमधील मंत्री, लोकप्रतिनिधी आणि मान्यवरही येणार आहेत. पंतप्रधान मोदी या कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करतील.
या कार्यक्रमाची वैशिष्टय़े
व्हिवाटेक युरोपमधील सर्वात मोठा स्टार्टअप कंपन्यांचा कार्यक्रम म्हणून ओळखला जातो. तो 2016 पासून दरवर्षी आयोजित करण्यात येतो. फ्रान्सची प्रमुख मिडिया कंपनी लेस इकोस आणि पब्लिसिस ग्रुप या प्रमुख जाहिरात कंपनीकडून या कार्यक्रमाचे आयोजन संयुक्तरित्या करण्यात येते. तंत्रज्ञान क्षेत्रातील नव्या कंपन्या आणि आधुनिक संशोधन करणारी केंद्रे या कार्यक्रमात भाग घेऊन भविष्याचा कल ओळखण्याचा प्रयत्न करतात. या कार्यक्रमात नवे तंत्रज्ञान आणि नवी तांत्रिक साधने व उपकरणे यांचे प्रदर्शनही असते, जे पाहण्यासाठी असंख्य लोक गर्दी करतात. याशिवाय चर्चासत्रे आणि व्याख्याने यांचाही समावेश असतो.