क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर आज एफसी गोवा आणि मुंबई सिटी एफसी क्लब यांच्यात स्फोटक लढत होणार आहे. ज्याप्रमाणे कोलकाता डर्बीला महत्व आहे, त्याचप्रमाणे आज बुधवारी होणाऱया मुंबई आणि गोवा या आयएसएलमधील लढतीला आता तेवढचं महत्व मिळत आहे.
हा सामना केवळ गोवेकरांसाठीच नव्हे तर दोन्ही संघांतील काही खेळाडूंना आणि प्रामुख्याने मुंबई सिटीचे सध्याचे प्रशिक्षक सर्जिओ लॉबेरासाठीही तेवढाच महत्वाचा आहे. दोन्ही संघांचे प्रशिक्षक स्पेनचे, यामुळे आज शॉर्ट पासेसचा वेगवान खेळ बघण्याची संधी फुटबॉलप्रेमींना मिळणार आहे. एफसी गोवाचे माजी प्रशिक्षक राहिलेल्या सर्जिओने या संघाला एक नावलौकीक मिळवून दिला होता. गेल्या आयएसएल फुटबॉल मोसमात एफसी गोवाने तर आयएसएल लीगचे जेतेपदही मिळविले होते.
मात्र, स्पर्धेच्या अखेरीस त्यांना प्रशिक्षकपदावरून काढण्यात आले. यंदा लॉबेरा मुंबई सिटी संघाचे प्रमुख प्रशिक्षक झाले आहेत. त्यांनी आणलेले अहमद जोहू, हय़ुगो बूमोस, मुर्ताडा फॉल, मंदार राव देसाई आता एफसी गोवाचे खेळाडू त्यांच्या मुंबई सिटीला करारबद्ध झाले आहे. एफसी गोव्यातही आता बदल झाले असून त्यांची जागा दर्जेदार विदेशी आणि देशी फुटबॉलपटूंनी घेतली आहे.
एफसी गोवाने आपले नवीन प्रशिक्षक स्पेनचे ज्युआन फॅर्रांडो यांच्या प्रशिक्षणाखाली आपल्या पहिल्या लीग सामन्यात बेंगलोर एफसीला दोन गोलांच्या पिछाडीनंतर बरोबरीत रोखले. मुंबई सिटीला मात्र नॉर्थईस्ट युनायटेड विरूद्ध अहमद जोहूला रेड कार्ड पडल्यानंतर एक गोलने पराभूत व्हावे लागले आहे.
एफसी गोवा आणि मुंबई सिटी एफसी या दोन्ही संघांची खेळण्याची पद्धत समान आहे. आम्ही नॉर्थईस्ट युनायटेड विरूद्धच्या सामन्यात चांगला सांघिक खेळ केला. सर्वाधिक बॉल पझेशनही आमचचं होतं. या सामन्यात आमच्या फारुख चौधरी आणि सार्थक गोलूय यांच्या गोल करण्याच्या संधी वाया गेल्या. खेळाच्या काही क्षेत्रात आम्ही प्रतिस्पर्धी संघापेक्षा वरचढ ठरलो, असे लॉबेरा म्हणाले.
आम्ही बहुतांश खेळ 10 खेळाडूंनीशी खेळलो आणि सामन्यावर वर्चस्वही ठेवले, असे मुंबई सिटीचे प्रशिक्षक सर्जिओ लॉबेरा म्हणाले. नॉर्थईस्ट विरूद्धच्या सामन्यात रेड कार्ड पडल्याने लॉबेराचा हा प्लेमकर आजच्या सामन्यात खेळणार नाही. मात्र जोहूच्या तोडीचा खेळाडू आमच्याकडे आहे, असे लॉबेरा म्हणाले.
मला प्रतिस्पर्ध्यांची चिंता नाही. माझं काम संघाकडून चांगली कामगिरी करून घेणे हे आहे. तोडीस तोड खेळ करणे आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन पुढे जाणे, हे माझे पहिलं लक्ष्य असल्याचे एफसी गोवाचे प्रशिक्षक ज्युआन फॅर्रांडो म्हणाले. आज मुंबई सिटी संघाशीस नव्हे, तर सर्व सामन्यात 3 गुण प्राप्त करणे हे आमच्यासाठी क्रमप्राप्त असल्याचे ते शेवटी म्हणाले.