ऑनलाईन टीम / पुणे :
21 मे रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून उमेदवारी डावलल्याने भाजपमध्ये नाराजीची लाट आली आहे. पुण्यातील माजी आमदार मेधा कुलकर्णी या देखील नाराज आहेत. याबाबत मेधा कुलकर्णी यांनी ट्विटर वर पोस्ट केली आहे.
त्या आपल्या ट्विट मध्ये म्हणतात की, ‘आज फिर दिल ने एक तमन्ना की… आज फिर दिल को हमने समझाया’ असे गाण्याचे बोल लिहिले आहेत.
या पूर्वी विधानसभा निवडणुकीत मेधा कुलकर्णी यांचे कोथरूड मतदारसंघातून ऐन वेळी तिकीट कापून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी त्यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली जाईल असे आश्वासनही देण्यात आले होते. पण पक्षाने उमेदवारी डावलल्याने नाराज मेधा कुलकर्णी यांनी ट्विटर वर सूचक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी भाजपचा उल्लेख न करता उमेदवारी न दिल्याने आपणच आपली समजूत घातली आहे असे म्हटले आहे.
दरम्यान, शुक्रवारी भाजपने चार जागांसाठी प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, रणजीत सिंह मोहिते पाटील आणि अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान भाजपमधील अनेक निष्ठावंत नेते उमेदवारी न मिळाल्याने नाराज आहेत यामध्ये वरिष्ठ नेते एकनाथ खडसे, राम शिंदे, पंकजा मुंडे यांनी देखील आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली आहे.