रात्री 9 वाजल्यापासून सर्व प्रकारची बससेवा होणार बंद ; परिवहनला पुन्हा फटका बसणार
प्रतिनिधी / बेळगाव
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढल्याने पुन्हा शासनाने नियम कडक केले असून मंगळवारी रात्रीपासून क्लोजडाऊन करण्यात येणार आहे. त्यामुळे मंगळवारी दिवसभर बससेवा सुरू ठेवण्यात येणार असली तरी बुधवारपासून सर्व प्रकारची बससेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे.
मागील दोन दिवस विकेंड कर्फ्यूमुळे ठप्प झालेली बससेवा सोमवारी सुरळीत सुरू झाली. मात्र, शासनाने पुन्हा एकदा कडक नियम जारी केल्याने मंगळवारी रात्रीपासून सर्व प्रकारची बससेवा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे विविध ठिकाणी प्रवास करणाऱया प्रवाशांना प्रवास करण्यासाठी मंगळवारचा एक दिवस शिल्लक आहे. लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱया प्रवाशांनी मंगळवारी दिवसभरात प्रवास करून आपल्या इच्छीत स्थळी जावे, असे आवाहन परिवहनने केले आहे.
गतवर्षीपासून कोरोनामुळे परिवहन मंडळ अडचणीत आले आहे. मागील वषी कोरोनामुळे बससेवा चार-पाच महिने बंद होती. अनलॉकनंतर सुरू झालेल्या बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, परिवहनला कोटय़वधी रुपयांचा फटका बसला. त्यानंतर सुरू झालेल्या बससेवेला दोन वेळा परिवहन कर्मचाऱयांच्या संपाचा फटका बसला. पुन्हा आता कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याने शासनाने 14 दिवस क्लोजडाऊनचा नियम जारी केला आहे. त्यामुळे पुन्हा मंगळवारी रात्रीपासून 14 दिवस बंद राहणार आहेत. बेळगाव विभागातून महाराष्ट्रात धावणाऱया बसची संख्या ही अधिक आहे. मात्र, महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य बससेवा ठप्प झाली आहे. बेळगाव विभागाला विविध मार्गांवर धावणाऱया बसच्या माध्यमातून दररोज लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र, क्लोजडाऊनमुळे तब्बल 14 दिवस बससेवा बंद राहणार असल्याने परिवहनला मोठा फटका बसणार आहे. बेळगाव आगारात रामदुर्ग, बैलहोंगल, खानापूर आगारांचा समावेश आहे. या सर्वच आगारांतून धावणाऱया बस क्लोजडाऊनमुळे मंगळवारी रात्रीपासून जागेवर थांबून राहणार आहेत. मागील वर्षभरापासून आर्थिकदृष्टय़ा अडचणीत असलेल्या परिवहनसमोर पुन्हा अडचणी निर्माण होणार आहेत. गतवर्षीपासून उत्पन्नात वाढ न झाल्याने परिवहनला कर्मचाऱयांच्या वेतनासाठी राज्य सरकारची मदत घ्यावी लागली होती. आता क्लोजडाऊनमुळे पुन्हा परिवहनसमोर अडचणी वाढल्या आहेत.