क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
एटीके मोहन बागान आणि नॉर्थईस्ट युनायटेड एफसी यांच्यात आज मंगळवारी फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर सातव्या हिरो इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेच्या दुसऱया उपान्त्य फेरीतील निर्णायक सेकंड लेग लढत खेळविण्यात येईल.
बांबोळीत खेळविण्यात आलेली पहिल्या टप्प्यातील लढत 1-1 अशी बरोबरीत संपली होती. आता नॉर्थईस्ट युनायटेड एफसी प्रथमच अंतिम फेरी गाठणारा की आंतोनियो हबास यांचा एटीके मोहन बागान ही कामगिरी तिसऱयांदा करणार याची उत्सुकता आहे. पहिल्या लेगमध्ये इद्रीसा सिला याच्या भरपाई वेळेतील गोलमुळे एटीके मोहन बागानला बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. या निकालामुळे त्यांच्यावरील दडपणही वाढले आहे.
एटीकेला पहिल्या उपान्त्य लढतीत आणि त्या आधीच्या काही सामन्यांत सर्वोत्तम खेळ करता आला नाही.
संपूर्ण मोसमात त्यांचा बचाव भक्कम राहिला आहे. लीगमध्ये त्यांच्याविरूद्ध केवळ 15 गोल झाले. गेल्या तीन सामन्यांत मात्र त्यांना पाच गोल स्वीकारावे लागले व त्यामुळेच लीगमधील त्यांचे अव्वल स्थान हुकले तसेच पहिल्या टप्प्यातील सामन्यात वर्चस्वही राखता आले नाही. आमच्यावर कोणतेही दडपण नाही. ही मोठीच संधी आहे आणि ती पुन्हा येत नाही, असे एटीकेचे प्रशिक्षक हबास म्हणाले.