चकित करणारे होते कारण
कजाकिस्तानच्या एका छोटय़ा गावात काही वर्षांपूर्वी एका रहस्यमय समस्येला लोक तेंड देत होते. या गावातील 150 हून अधिक लोकांना हिंसक मतिभ्रम होऊ लागला होता आणि हे लोक एक आठवडाभर झोपी जात होते. याचमुळे गावातील लोक झोपण्यास घाबरू लागले होते. कलाची नाच्या या गावातील लोकांना अत्यंत विचित्र स्थितीला सामोरे जावे लागत होते.
या गावात बहुतांशी जर्मन आणि रशियन लोक राहतात. ग्रामस्थ अचानक झोपी जात होते, अनेकदा तर चालता चालता झोपी जात आणि नंतर अशक्तपणा, डोकेदुखी आणि विस्मृतीसह जागे व्हायचे. अनेकदा हे लोक झोपेतच चालायला लागायचे, पण त्यांना जागे करताच काहीच आठवत नसे.
गावातील केवळ प्रौढच नव्हे तर मुले देखील अजीब समस्येला तोंड देत होती. त्यांना बिछान्यात साप किंवा उडणारे अश्व दिसून यायचे. सोव्हियत संघाच्या काळापासून या गावानजीक युरेनियमची खाण असल्याने असे घडत असल्याचे काही लोकांचे मानणे होते.
तर पाण्यात एखादे रसायन मिसळून ग्रामस्थांच्या मेंदूवर नियंत्रण मिळविले जात असल्याचे अनेकांचे म्हणणे हेते. पण याप्रकरणी सरकारने स्वतःचा अहवाल मांडला होता. 2015 मध्ये कजाकिस्तान सरकारने एक विधान प्रसिद्ध करत या क्षेत्रातील एका खाणीतून बाहेर पडत असलेल्या कार्बन मोनोऑक्साइडमुळे लोक विचित्र वागत असल्याचे सांगितले होते.
गावाच्या परिसरात तपासणी करण्यात आली असता तेथे कार्बन मोनोऑक्साइडचे प्रमाण सरासरीपेक्षा 10 पट अधिक आढळले होते. त्यानंतर सरकारने अनेक कुटुंबांना तेथून हलविले होते. सध्या या गावात 120 कुटुंबे राहत असून कार्बन मोनोऑक्साइडचे प्रमाण आता खालावल्याने लोक सामान्य जीवन जगत आहेत.