सेन्सेक्स 143 तर निफ्टी 66.80 अंकांनी वधारला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय भांडवली बाजारात पुन्हा सप्ताहाच्या अंतिम सत्रात शुक्रवारी सेन्सेक्स व निफ्टी दोन्हीचे निर्देशांक सावरत बंद झाल्याचे पहावयास मिळाले आहेत. यामध्ये प्रमुख कंपन्यांपैकी रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस आणि आयसीआयसीआय बँक यासारख्या मोठय़ा कंपन्यांच्या समभागांच्या मजबूत कामगिरीमुळे बाजार सावरला आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 142.81 अंकांनी वधारुन 59,744.65 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 66.80 अंकांनी तेजीत राहून निर्देशांक 17,812.70 वर बंद झाला आहे.
सेन्सेक्समध्ये एशियन पेन्ट्सचे समभाग सर्वाधिक 1.79 टक्क्यांनी वधारुन बंद झाले असून अन्य कंपन्यांमध्ये टीसीएस, नेस्ले इंडिया, अल्ट्राटेक सिमेंट, आयसीआयसीआय बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग मजबूत स्थिती प्राप्त करत बंद झाले आहेत. दुसऱया बाजूला बजाज फिनसर्व्ह, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, बजाज फायनान्स, एचडीएफसी आणि टायटन यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.
जागतिक पातळीवरील बाजारांपैकी हाँगकाँगचा हँगसेंग आणि दक्षिण कोरियाचा कॉस्पी हे तेजीत राहिले आहेत. तसेच चीनमधील शांघाय कम्पोजिट निर्देशांक आणि जपानचा निक्की हे घसरणीसह बंद झाले आहेत. युरोपातील प्रमुख बाजारात दुपारच्या दरम्यान मिळताजुळता कल राहिला होता.
शेअर बाजारातील आकडेवारीनुसार विदेशी संस्थांकडून करण्यात आलेल्या गुंतवणुकीमध्ये 1,926.77 कोटींच्या समभागांची विक्री झाल्याची नोंद करण्यात आली आहे. देशासह जगभरात कोरोनासह ओमिक्रॉनचा संसर्ग वेगाने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर विविध तज्ञांकडून या संदर्भात तर्कवितर्क मांडले जात असून यानुसारच आगामी आठवडय़ातील बाजाराचा प्रवास ठरणार असल्याचे संकेत आहेत.