सेन्सेक्स 568 तर निफ्टी 182 अंकांनी वधारला
वृत्तसंस्था/ मुंबई
आठवडय़ाच्या अंतिम दिवशी शक्रवारी भारतीय भांडवली बाजार सलगच्या घसरणीनंतर सावरला असल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये जागतिक बाजारांमधील सकारात्मक कल आणि देशातील शेअर बाजारातील एचडीएफसी बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि आयसीआयसीआय बँक यांच्या समभागांच्या मदतीने सेन्सेक्स 568 अंकांनी तेजीत राहिला आहे.
दिवसभरातील प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीनंतर शेअर बाजारात दिवसअखेर सेन्सेक्स 568.38 अंकानी वधारत 1.17 टक्क्यांच्या मजबूतीसह निर्देशांक 49,008.50 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 182.40 अंकांसह 1.27 टक्क्यांसोबत निर्देशांक 14,507.30 वर स्थिरावल्याचे पहावयास मिळाले आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये बजाज फायनान्सचे समभाग सर्वाधिक चार टक्क्यांनी तेजीत राहिले आहेत. यासोबत टायटन, एशियन पेन्ट्स, हिंदुस्थान युनिलिव्हर, भारती एअरटेल, बजाज ऑटो आणि नेस्ले इंडिया यांचे समभाग तेजीत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये पॉवरग्रिड कॉर्प, इंडसइंड बँक, आयटीसी आणि मारुती सुझुकीचे समभाग मात्र घसरणीसह बंद झाले आहेत.
दिवसभरातील ट्रेडिंगमध्ये जागतिक बाजारात सकारात्मक कल राहिल्याने देशातील बाजार मजबूत कामगिरीसोबत बंद झाला आहे. अन्य आशियाई बाजारातील चीनचा शांघाय कम्पोजिट, हाँगकाँगचा हँगसेंग, जपानचा निक्की आणि दक्षिण कोरियाचा कॉस्पी उल्लेखनीय लाभासोबत बंद झाला आहे.
वाढत्या कोरोनाची चिंता कायम
जगासह देशभरात कोरोना संसर्गाची दुसरी लाट विस्तारत असल्याच्या वातावरणामुळे गुंतवणूकदारांसह सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा परिणाम दीर्घ कालावधीसाठी व ठराविक कालावधीत गुंतवणूक करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. पण हे चिंतेचे वातावरण दूर होईल, असे दिसते.