नेपाळच्या नेत्रचिकित्सकाचा पद्मश्रीने गौरव
एम्समध्ये शिक्षण घेतलेले नेपाळचे नेत्र चिकित्सक डॉ. संदुक रुइत यांनी मोतिबिंदूच्या शस्त्रक्रियेचा खर्च 90 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. दर आठवडय़ाला ते 2,500 रुग्णांवर उपचार करतात. फी देणे शक्य नसलेल्या रुग्णांवर ते मोफत उपचार करत आहेत. त्यांच्या याच परोपकारी सेवेमुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी डॉ. संदुक यांना पद्मश्रीने गौरविले आहे.
डॉ. संदुक यांनी काठमांडूत तिलगंगा नेत्रविज्ञान संस्थेची स्थापना केली आहे. या हिमालयीन देशाच्या पर्वतीय आणि मैदानी भागातील दुर्गम गावांचा ते नियमित दौरा करतात. स्वतःसोबत तज्ञांचे एक पथक आणि उपकरणे नेत गावांमध्ये मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करतात. त्यांच्या उपचाराचा केवळ नेपाळच नव्हे तर भारतातील लोकही लाभ घेत आहेत.
नेपाळमध्ये ‘दृष्टीचे देवता’ म्हणून ओळखल्या जाणाऱया डॉ. रुइत यांनी जगातील या हिस्स्यात अनावश्यक स्वरुपात आंधळे होणारे लोक असू नयेत हा माझा उद्देश असल्याचे म्हटले आहे. सर्व लोकांना उत्तम उपचार मिळावे असा प्रयत्न आहे. नेपाळ हा गरीब देश असल्याने येथील बहुतांश लोकांना उत्तम उपचार मिळविणे अशक्य आहे. अशा स्थितीत डॉ. रुइत यांनी नेपाळमधील गरीबांवर मोफत उपचार करत मोठी जनसेवा केली आहे. डॉ. रुइत यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.