आयसीसी यू-19 टी-20 पात्रता फेरीत युएईविरुद्ध लढतीत नामुष्की, नेपाळचे 6 फलंदाज शून्यावर बाद
बांगी-मलेशिया / वृत्तसंस्था
आयसीसी यू-19 महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीत नेपाळचा डाव अवघ्या 8 धावांमध्येच खुर्दा झाला! संयुक्त अरब अमिरातविरुद्ध सामन्यात त्यांना या नामुष्कीला सामोरे जावे लागले.
यंदा यू-19 महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा प्रथमच आयोजित केली गेली असून पात्रता फेरीत नेपाळसह युएई, थायलंड, भुतान व कतार यांचा समावेश आहे. या 5 देशांच्या स्पर्धेतील विजेता संघ दक्षिण आफ्रिकेतील मुख्य स्पर्धेत सहभागी होईल. ही स्पर्धा आफ्रिकन भूमीत 2023 च्या प्रारंभिक टप्प्यात होणार आहे.
यापूर्वी, नेपाळच्या संघाने कतारचा अवघ्या 38 धावांमध्ये खुर्दा केला आणि तो सामना 79 धावांनी जिंकला. मात्र, त्यानंतर शनिवारी त्यांना मोठय़ा नामुष्कीला सामोरे जावे लागले. अवघ्या 9.2 षटकातच हा पूर्ण सामना निकाली झाला. दोन्ही संघांकडून एकाही फलंदाजाला अगदी दुहेरी धावसंख्या जमवण्याला अवकाशही नव्हता, इतकी ही लढत छोटी राहिली. युएईच्या तीर्था सतीशने नाबाद 4 धावा केल्या आणि आश्चर्य म्हणजे हीच या सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या ठरली.
नेपाळ संघाने फलंदाजी केली, त्यावेळी त्यांचे 11 पैकी 6 फलंदाज अगदी भोपळाही फोडू शकले नाहीत. स्नेहा महाराने 10 चेंडूत 3 धावा केल्या आणि नेपाळ संघातर्फे ही वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या ठरली. मनीषा राणाने 2 धावा केल्या आणि अन्य 3 फलंदाजांनी प्रत्येकी 1 धाव केली.
युएईतर्फे नव्या चेंडूवर गोलंदाजी करणाऱया ऑफस्पिनर माहिका गौरने 4 षटकात 2 निर्धाव, 2 धावा व 5 बळी असे गोलंदाजी पृथक्करण नोंदवत नेपाळचा निम्मा संघ गारद केला. नव्या चेंडूवरील तिची सहकारी इंदुजा नंदकुमारने देखील प्रभावी मारा करत 4 षटकांचा कोटा पूर्ण करताना 6 धावात 3 फलंदाजांना बाद केले. नेपाळचा डाव अवघी 8.1 षटके चालला तर युएईने 9 धावांचे टार्गेट अवघ्या 7 चेंडूतच पार केले. तीर्था सतीश व लावण्या केनी यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले.
आयसीसी कनिष्ठ स्तरावर महिला क्रिकेटची पाळेमुळे रुजवण्यासाठी प्रयत्नशील असून संलग्न सदस्य देश देखील कनिष्ठ स्तरावर अनेक उपक्रम राबवत आहेत. वास्तविक, नेपाळमध्ये अगदी पुरुष क्रिकेट संघासाठीही अद्याप अव्वल दर्जाचे टर्फ पिचेस उपलब्ध नाहीत. पण, या प्रतिकूल परिस्थितीतही नेपाळच्या महिला संघाने पात्रता फेरीतील यापूर्वीचा पहिला सामना जिंकला, ते लक्षवेधी होते. पात्रता स्पर्धेतील सहभागी संघांमध्ये युएईचा संघ अधिक मजबूत असून दक्षिण आफ्रिकेतील आगामी वर्ल्डकपचे तिकीट निश्चित करण्यासाठी त्यांना प्रबळ दावेदार मानले जात आहे.
संक्षिप्त धावफलक
नेपाळ ः 8.1 षटकात सर्वबाद 8 (स्नेह राणा 3 धावा, माहिका गौर 2 धावात 5 बळी, इंदुजा नंदकुमार 6 धावात 3 बळी). युएई ः 1.1 षटकात बिनबाद 9.