पथरदेवा मतदारसंघ : सूर्यप्रताप शाही अन् ब्रह्माशंकर त्रिपाठी यांच्यात लढत
उत्तरप्रदेश निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात सर्वांच्या नजरा देवरियामधील पथरदेवा मतदारसंघावर लागून राहिल्या आहेत. या मतदारसंघात मंत्री आणि माजी मंत्र्यांमध्ये राजकीय लढत आहे. भाजपकडून योगी सरकारमध्ये कृषी मंत्री असलेले सूर्यप्रताप शाही मैदानात आहेत. तर समाजवादी पक्षाकडून माजी मंत्री ब्रह्माशंकर त्रिपाठी निवडणूक लढवत आहेत. ब्रह्माशंकर आणि सूर्यप्रताप यांच्यातील राजकीय संघर्ष 1985 पासून सुरू असून दोघेही आठव्यांदा परस्परांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.
पथरदेवा मतदारसंघात कृषिमंत्री सूर्यप्रताप शाही राजकीय चक्रव्यूहात अडकले आहेत, परंतु दोन मुस्लीम उमेदवार उभे असल्याने विजय होईल अशी अपेक्षा त्यांना आहे. शाही यांनी मागील निवडणूक सप उमेदवार आणि माजी कॅबिनेट मंत्री शाकिर अली यांना पराभूत केले होते. शाकिर यांचे निधन झाल्याने सपने ब्रह्माशंकर त्रिपाठी यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे शाकिर यांचे पुत्र परवेज यांनी बसपमध्ये प्रवेश करत निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे.
पथरदेवा मतदारसंघात भाजप आणि सप यांच्यात मुख्य लढत होण्याची चिन्हे असली तरीही बसप आणि काँग्रेसचे उमेदवारही जोरदार प्रचार करत आहेत. भाजप उमेदवार सूर्यप्रताप शाह यांची नजर भूमिहार मतांसह सैंथवार आणि अनुसूचित जातीच्या मतपेढीवर आहे. तर सप उमेदवार त्रिपाठी हे पक्षाच्या पारंपरिक मतदारांसह मुस्लीम-यादव तसेच ब्राह्मण मतदारांच्या सहाय्याने विजयाची अपेक्षा करत आहेत. या मतदारसंघात मुस्लीम आणि सैंथवार मतदारांचे प्रमाण अधिक आहे. यामुळे काँग्रेस आणि बसपने मुस्लीम उमेदवार उभा करत सपच्या चिंता वाढविल्या आहेत.
1985 मध्ये त्रिपाठी आणि शाही यांनी सर्वप्रथम कसया मतदारसंघात परस्परांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. यात सूर्यप्रताप विजयी झाले होते. 1989 च्या निवडणुकीत ब्रह्माशंकर त्रिपाठी यांनी जनता दलाच्या वतीने निवडणूक लढवत विजय मिळविला होत. तर 1991 मध्ये सूर्यप्रताप शाही यांनी त्रिपाठी यांना पराभूत केले. 1993 मध्ये सपकडून उभे राहिलेले त्रिपाठी विजयी झाले. पाचव्यांदा 1996 मध्ये पुन्हा सूर्यप्रताप जिंकले आणि ब्रह्माशंकर यांना पराभव चाखावा लागला. 2002 मध्ये ब्रह्माशंकर यांनी निवडणुकीत विजयश्री खेचून आणली.
2007 च्या निवडणुकीत त्रिपाठी यांनी शाही यांना पराभूत केले. त्यानंतर परिसीमनानंतर पथरदेवा मतदारसंघ अस्तित्वात आला. शाही यांनी कसया मतदारसंघ सोडून पथरदेवा येथे निवडणूक लढविली परंतु सपच्या शाकिर अली यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. 2017 च्या निवडणुकीत शाही विजयी झाले होते.
पथरदेवा मतदारसंघात सर्वाधिक मुस्लीम मतदार असून त्यानंतर दलित मतदारांचा क्रमांक लागतो. मुस्लीम 60 हजार, दलित 50 हजार, सैंथवार 37 हजार, वैश्य 32 हजार, यादव 25 हजार, ब्राह्मण 19 हजार, क्षत्रिय 13 हजार, कुशवाह 12 हजार, राजभर 11 हजार, निषाद 6 हजार, भूमिहार 5 हजार, चौहान 6 हजान आणि अन्य समुदायांची 48 हजार मते आहेत.