55 उमेदवार करोडपती, 50 जणांच्या विरोधात अत्यंत गंभीर गुन्हे
बंगाल विधानसभा निवडणुकीच्या आठव्या टप्प्यातील 283 पैकी 64 उमेदवारंच्या विरोधात गुन्हे नोंद आहेत. यातील 50 जणांच्या विरोधात अत्यंत गंभीर गुन्हे आहेत. यात भाजपचे 21, तृणमूल काँग्रेसचे 11, काँग्रेसचे 10 आणि माकपचे 7 उमेदवार सामील आहेत. आठव्या टप्प्यात 55 कोटय़धीश उमेदवार आहेत. यात तृणमूलचे 28, भाजपचे 12, काँग्रेसचे 5 आणि माकपचा एक उमेदवार सामील आहे. आठव्या टप्प्यातील उमेदवारांची सरासरी मालमत्ता 1.08 कोटी रुपये इतकी आहे. भाजपचे तापस कुमार यादव हे आठव्या टप्प्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. वीरभूम जिल्हय़ातील नलहाटी मतदारसंघातून ते निवडणूक लढवत आहेत. प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण मालमत्ता 34 कोटी 60 लाख 93 हजार 674 रुपयांच्या मूल्याची आहे.
दुसरीकडे कोलकात्यातील काशीपूर-बेलगछिया मतदारसंघातील अपक्ष उमेदवार कुश महाली सर्वात गरीब उमेदवार ठरले आहेत. त्यांची एकूण मालमत्ता 500 रुपयांची आहे. कोलकात्यातील चौरंगी मतदारसंघातील तृणमूलच्या विद्यमान आमदार नयना बंडोपाध्याय यांची मालमत्ता मागील 5 वर्षांमध्ये सर्वाधिक 185.67 टक्क्यांनी वाढली आहे. दुसरीकडे वीरभूमच्या नानूर मतदारसंघातील माकपच्या विद्यमान आमदार श्यामली प्रधान यांची मालमत्ता या 5 वर्षांमध्ये सर्वाधिक घटली आहे.
आठव्या टप्प्यातील 152 उमेदवारांनी स्वतःची शैक्षणिक पात्रता पाचवी ते बारावीदरम्या असल्याचे म्हटले आहे. तर 127 उमेदवार पदवीधर किंवा त्याहून अधिक शिक्षित आहेत. 81 उमदेवार उमेदवार हे 25-40 या वयोगटातील आहेत. तर 158 उमेदवार हे 41-60 या वयोगटातील आहेत. तर 44 उमेदवारांचे वय 61-80 वर्षांदरम्यान आहे. आठव्या टप्प्यात 35 महिला उमेदवार आहेत.