लेजेंड्स ऑनलाईन बुद्धिबळ : कार्लसनचा आठवा विजय
वृत्तसंस्था/ चेन्नई
भारताच्या विश्वनाथन आनंदने लेजेंड्स ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेतील पराभवाची मालिका सातव्या फेरीत खंडित केली खरी. पण त्याला हा जोम टिकविता न आल्याने पुढच्याच फेरीत त्याला पुन्हा पराभवाला सामोरे जावे लागले. यावेळी जागतिक तिसऱया मानांकित चीनच्या डिंग लिरेनने त्याला 2.5-0.5 असे हरविले. या फेरीतही वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसन विजयी झाला. पण त्याला सुदैवाची साथ लाभली होती.
सहा सामन्यांची पराभवाची मालिका खंडित करीत आनंद डिंगविरुद्ध उतरला होता. पण पहिल्याच डावात केवळ 22 चालीत आनंदने शरणागती पत्करली. दुसरा डाव 47 चालीत बरोबरीत राहिला. पण तिसऱया डावात डिंगने काळय़ा मोहरांनी खेळताना 41 चालीत आणखी एक विजय मिळवित लढत जिंकली. आनंदचे 6 गुण झाले असून डिंग व पीटर लेकोसमवेत तो तळाच्या स्थानावर आहे. नवव्या व शेवटच्या फेरीत आनंदची लढत व्हॅसील इव्हान्चुकशी होणार आहे.
वर्ल्ड चॅम्पियन कार्लसनने रशियाच्या इयान नेपोमनियाचीचे कडवे आव्हान परतावून लावत सुदैवानेच विजय मिळविला. चार डावांची लढत 2-2 अशी बरोबरीत राहिल्यानंतर आर्मागेडॉन (टायब्रेक) लढतही बरोबरीत राहिली. पण कार्लसन काळय़ा मोहरांनी खेळत असल्याने नियमानुसार त्याला विजयी घोषित करण्यात आले. त्याला विजयाचे तीन गुण मिळाले. एकूण 22 गुणांसह त्याने अग्रस्थान कायम राखले असून नेपोमनियाची (19) व अनिश गिरी (15) त्याच्या पाठोपाठ आहेत. कार्लसनने आतापर्यंत झालेल्या आठही लढती जिंकल्या आहेत. या फेरीत गिरीला अनुभवी इव्हान्चुककडून 2-3 असा पराभव स्वीकारावा लागला असला तरी त्याला उपांत्य फेरी गाठण्याची संधी आहे. ही स्पर्धा मॅग्नस कार्लसन चेस टूरचा एक टप्पा असून येथील विजेता या टूरच्या ग्रँड फायनलसाठी पात्र ठरणार आहे. 9 ते 20 ऑगस्ट या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.
आठव्या फेरीचे निकाल : लिरेन वि.वि. आनंद 2.5-.05, कार्लसन वि.वि. नेपोमनियाची 2.5-2.5 (आर्मागेडॉननंतर विजयी), स्विडलर वि.वि. क्रॅमनिक 2.5-1.5, इव्हान्चुक वि.वि. अनिश गिरी 3-2, गेलफँड वि.वि. पीटर लेको 3-2.