15 जणांनी कोकणीतून, 7 जणांनी घेतली मराठीतून शपथ
प्रतिनिधी /पणजी
राज्य विधानसभेच्या मंगळवारी झालेल्या विशेष अधिवेशनात सर्व नवनिर्वाचित सदस्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देण्यात आली.
राज्य विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आयोजित हे पहिलेच अधिवेशन होते. राज्यपालांतर्फे पिठासीन अधिकारी (हंगामी सभापती) म्हणून नियुक्त आमदार डॉ. गणेश गावकर यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन घेण्यात आले. डॉ. गावकर यांचा शपथविधी सोमवार दि. 14 रोजी राजभवनवर पार पडला होता. त्यानंतर काल त्यांच्या अध्यक्षतेखाली उर्वरित सदस्यांना शपथ देण्यात आली. सर्वप्रथम मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी आपल्या पदाची शपथ घेतली. त्यानंतर प्रवीण आर्लेकर (पेडणे), डॉ. चंद्रकांत शेटय़े (डिचोली), नीळकंठ हळर्णकर (थिवी), जोशुआ डिसोझा (म्हापसा), डिलायला लोबो (शिवोली), केदार नाईक (साळगाव), मायकल लोबो (कळंगूट), रोहन खंवटे (पर्वरी), कार्लुस फरेरा (हळदोणे), बाबूश मोन्सेरात (पणजी), जेनिफर मोन्सेरात (ताळगाव), रुडाल्फ फर्नांडिस (सांताक्रूझ), विरेश बोरकर (सांत आंद्रे), राजेश फळदेसाई (कुंभारजुवा), प्रेमेंद्र शेट (मये), डॉ. प्रमोद सावंत (सांखळी), डॉ. दिव्या राणे (पर्ये), विश्वजित राणे (वाळपई), गोविंद गावडे (प्रियोळ), रवी नाईक (फोंडा), सुभाष शिरोडकर (शिरोडा), सुदिन ढवळीकर (मडकई), संकल्प आमोणकर (मुरगाव), कृष्णा साळकर (वास्को), माविन गुदिन्हो (दाबोळी), आंतोनियो वास (कुठ्ठाळी), आलेक्स सिक्वेरा (नुवे), आलेक्स लॉरेन्स (कुडतरी), विजय सरदेसाई (फातोर्डा), दिगंबर कामत (मडगाव), वेन्झी व्हिएगश (बाणावली), उल्हास तुयेकर (नावेली), युरी आलेमाव (कुंकळ्ळी), क्रूझ सिल्वा (वेळ्ळी), ऍल्टन डिकॉस्टा (केपे), नीलेश काब्राल (कुडचडे), सुभाष फळदेसाई (सांगे) आणि रमेश तवडकर (काणकोण) यांनी पदाची शपथ घेतली.
हंगामी सभापती डॉ. गावकर यांनी घेतली होती इंग्रजीतून शपथ
वरील सदस्यांपैकी 15 जणांनी कोकणीतून, सात जणांनी मराठीतून तर उर्वरितांनी इंग्रजीतून शपथ घेतली. हंगामी सभापती डॉ. गावकर यांनीही राज्यपालांसमोर इंग्रजीतूनच शपथ घेतली होती.
प्रतापसिंह राणे यांची अनुपस्थिती जाणवली
दरम्यान, कायमस्वरुपी सदस्य असल्यागत प्रत्येक विधानसभेत दिसणारे प्रतापसिंह राणे यांनी राजकारणातून निवृत्ती घेतल्यामुळे यंदाची निवडणूक लढविली नव्हती. त्यामुळे आठव्या विधानसभेत त्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती. श्री. राणे यांच्यावेळी ज्येष्ठतेत द्वितीय स्थानी व आता प्रथम स्थानी असलेले मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी अखंडित तब्बल सहाव्यांदा विधानसभेत प्रवेश केला आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह विश्वजित राणे, रवी नाईक, दिगंबर कामत, मायकल लोबो, नीळकंठ हळर्णकर, जोशुआ डिसोझा, रोहन खंवटे, बाबूश मोन्सेरात, जेनिफर मोन्सेरात, गोविंद गावडे, सुभाष शिरोडकर, आलेक्स लॉरेन्स आदी सदस्यांनी दुसऱयांदा, तिसऱयांदा प्रवेश केला आहे. आलेक्स सिक्वेरा, गणेश गावकर, सुभाष फळदेसाई, रमेश तवडकर आदी सदस्यांनी काही वर्षे राजकारणापासून दूर राहिल्यानंतर पुन्हा प्रवेश केला आहे. तर तब्बल 19 सदस्य प्रथमच सभागृहात पोहोचले आहेत.
प्रथमच सभागृहात प्रवेश करणाऱया आमदारांना तो एक अनोखा असाच अनुभव होता. त्यामुळे काहीजण बावचळल्यागत वाटत होते. दुसऱयांदा, तिसऱयांदा विधानसभेत पोहोचलेले आमदार सहजतेने वावरत होते तर नवखे आमदार निरागस विद्यार्थ्याप्रमाणे शांतपणे खुर्चीवर बसून होते.
बऱयाच नवख्या आमदारांना पाहून अनेक पत्रकार तसेच प्रेक्षकांमधूनही ’हा कोण?, तो कोण?, हा कुठल्या मतदारसंघाचा?, त्याने कुणाला पाडले?’ अशी प्रश्नार्थक कुजबूज ऐकू येत होती.
दोघे आले दुचाकीवरून, इतरांच्या कोटय़वधींच्या गाडय़ा
नजरेत भरण्यासारखा प्रकार म्हणजे प्रथमच आमदार बनलेले अनेकजण एकतर स्वतःच्या स्कुटरवरून किंवा मित्राच्या दुचाकीवरून विधानसभेत दाखल झालेले दिसून आले. कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वास स्वतःच्या स्कुटरवरून, तर सांत आंद्रेचे आमदार विरेश बोरकर मित्राच्या दुचाकीवरून विधानसभेत आले. अनेक प्रस्थापित सदस्य मात्र कोटय़वधी किंमतीच्या आलिशान कारगाडय़ातून येऊन दिमाखात विधानसभा प्राकारात उतरताना दिसत होते.
हे ठरले जायंट किलर
प्रथमच विधानसभेत पोहोचलेले चार आमदार जायंट किलर ठरले आहेत. गेली कित्येक दशके बाणावलीवर अधिराज्य गाजवणारे चर्चिल आलेमाव यांना प्रथमच एका नवख्या तरुणाने धूळ चारली आहे. आम आदमी पार्टीचे युवा उमेदवार वेन्झी व्हिएगश यांच्याकडून चर्चिल यांना पराभव पत्करावा लागला.
गेल्या कित्येक निवडणुकीत सतत विजयी होऊन केपेवर एकहाती सत्ता गाजवणारे उपमुख्यमंत्रीपदी असलेले बाबू कवळेकर यांनाही यंदा एका नवख्या उमेदवाराकडून पराभवाची चव चाखावी लागली. ऍल्टन डिकॉस्टा हे केपेतील जायंट किलर ठरले.
अनेक प्रकरणांमुळे बदनाम झालेले मुरगावचे आमदार तथा मंत्री मिलिंद नाईक यांना संकल्प आमोणकर यांनी तगडी टक्कर देत घरी पाठविले तर वेळ्ळीतून अनेक निवडणुका जिंकणारे फिलीप नेरी रॉड्रिगीश यांना आपच्या क्रूझ सिल्वा या नवख्या उमेदवाराने पराभवाचा सामना करण्यास लावले. योगायोग म्हणजे रॉड्रिगीश आणि सिल्वा हे दोघेही पेशाने अभियंते आहेत. त्यामुळे एका अभियंत्यास दुसऱया अभियंत्याकडूनच हार पत्करावी लागली.