65 हजार रुपये दंड वसूल : कारवाई सातत्याने सुरू ठेवणार
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेच्या आरोग्य विभागाने विनापरवाना व्यावसायिकांचा शोध घेऊन नोटीस बजावण्याची कारवाई सुरू केली आहे. गेल्या आठ दिवसांत 120 विनापरवाना व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या असून 65 हजार रुपये दंड वसूल केला आहे. यापुढेही ही कारवाई सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार शहर आणि उपनगरांतील विनापरवाना व्यावसायिकांचा शोध घेण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. गेल्या आठ दिवसांत टेंगिनकेरा गल्ली, किर्लोस्कर रोड, कडोलकर गल्ली, गणपत गल्ली अशा विविध परिसरातील व्यावसायिकांकडे परवान्याची तपासणी करण्यात आली.
यावेळी असंख्य व्यावसायिकांकडे परवाने नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे 120 व्यावसायिकांना नोटिसा बजावून व्यवसाय परवाने घेण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच 65 हजार रुपये दंड वसूल केला आहे. शुक्रवारी भोई गल्लीतील व्यापाऱयांकडे परवान्याची विचारणा करून नोटीस बजावण्यात आली. तसेच 12,500 रुपये दंड वसूल करण्यात
आला. या कारवाईमुळे व्यापाऱयांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.