प्रतिनिधी/ मडगाव
पुढील शनिवार पर्यंत गोव्यात तिसरे कोविड हॉस्पिटल कार्यरत होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. नव्या दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटलात हे तिसरे हॉस्पिटल सुरू केले जाणार असून त्याची पहाणी काल शनिवारी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केली. सद्या हे हॉस्पिटल कार्यरत करण्यासाठी युद्ध पातळीवर काम हाती घेण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात या ठिकाणी 250 खाटांची व्यवस्था केली जाणार आहे.
दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटलात गरज भासल्यास 566 खाटांची व्यवस्था करणे शक्य असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या हॉस्पिटलचे दोन मजले वापरात आणावे अशी मागणी स्थानिक आमदार विजय सरदेसाई तसेच विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्याकडून वारंवार केली जात असली तरी ते वापरात आणणे शक्य नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. हे दोन मजले नर्सिग इन्स्टिटय़ूटसाठी तयार करण्यात आले होते. या मजल्यावर विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी वर्ग तयार करण्यात आलेले आहेत. त्याचे रूपांतर हॉस्टिलमध्ये करणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना रूग्णांना प्राण वायू द्यावा लागतो व तशी व्यवस्था रूग्णांच्या खाटीजवळ केली जाते. अशी व्यवस्था या दोन मजल्यावर नसल्याचे ही यावेळी सांगण्यात आले.
सद्या पहिल्या टप्प्यात 250 खाटांची व्यवस्था केली जाणार आहे. गरज भासली तर 566 खाटां या ठिकाणी उलपब्ध करणे शक्य आहे. येवढय़ा खाटा पुरेशा आहेत असे आरोग्यमंत्री यावेळी म्हणाले. नव्या जिल्हा हॉस्पिटलात सद्या सुरू असलेले कोरोना चाचणी विभाग कायम ठेवले जातील. त्यात बदल केला जाणार नाही. या हॉस्पिटलात सौम्य ते मध्यम प्रकारचे कोरोना रूग्ण दाखल करून घेतले जाणार आहेत. तसेच त्यांची प्रकृती नाजूक बनली तर त्यांना मडगावच्या ईएसआय कोविड हॉस्पिटलात किंवा गोमेकॉत स्थलांतरीत केले जाणार आहे. त्यासाठी या ठिकाणी 24 तास रूग्ण वाहिका उलपब्ध असतील अशी माहिती देण्यात आली.
कोरोना रूग्णांनी वेळीच हॉस्पिटलात यावे
कोरोना रूग्णांनी लोक लज्जे पोटी किंवा भीती पोटी घरी न थांबता, कोरोनाची लक्षणे आढळून येताच, त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे होणे आवश्यक असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले. कोरोनाची लक्षणे असतानाही घरात थांबणे ही धोक्याची घंटा आहे. गेल्या सहा तासांत पाच जणांचे बळी गेले, कारण हे रूग्ण खुपच उशिरा हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यांच्यावर योग्य पद्धतीने वैद्यकीय उपचार करता आले नाही. जर रूग्ण वेळीच हॉस्पिटलात आले तर डॉक्टरांना उपचार करणे शक्य होत असते.
रूग्णांचे प्राण वाचविणे यालाच प्राधान्य
नव्या जिल्हा हॉस्पिटलात खाजगी मेडिलक कॉलेज सुरू केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. पण, सद्या तरी तसा कोणताच प्रस्ताव नाही. सद्या कोरोना बाधित रूग्णांचे प्राण वाचविणे यालाच आपले प्राधान्य आहे. कोरोना संपल्यानंतर नव्या जिल्हा इस्पितळात मेडिकल कॉलेज सुरू करायचे की नर्सिंग इन्स्टिटय़ूट सुरू कग्नरायचे यावर निर्णय घेतला जाईल. तो पर्यंत सद्या तरी कोरोना लढय़ा शिवाय अन्य कोणताच विचार सुरू नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
विरोधकांकडून खासगी मेडिकल कॉलेज सुरू करण्यास विरोध आहे. या संदर्भात बोलताना आरोग्यमंत्री म्हणाले की, गोव्यात खासगी मेडिकल कॉलेज सुरू करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिलेली आहे. पण, लोकांना जर हे खासगी मेडिकल कॉलेज नको असेल तर ते सुरू केले जाणार नाही. केवळ नर्सिंग इन्स्टिटय़ूटचाच विचार केला जाईल. असंख्य पालकांकडून गोमेकॉत एमबीबीएस साठी सीट वाढविण्याची मागणी होत आहे. परंतु, त्याला मर्यादा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नव्या दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटलात डॉक्टर तसेच नर्सिस व इतर कर्मचाऱयांना सुविधा उलपब्ध केल्या जातील. त्याच बरोबर डेटा एन्ट्री ऑपरेटर, नर्सेस व डॉक्टर उपलब्ध करण्यावर भर दिला जाणार आहे. त्याच बरोबर कोविड हॉस्पिटल कार्यरत झाल्यावर प्रवेश मर्यादित केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोडेक्सो तर्फे रूग्णांना जेवण, नाश्ताची व्यवस्था केली जाईल. रूग्णांबरोबर देखरखे ठेवणाऱया नातेवाईकाला सुद्धा सोडेक्सो जेवण पुरविणार असल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी गोमेकॉचे डिन डॉ. शिवानंद बांदेकर, आरोग्य खात्याच्या संचालक डॉ. गीता, डॉ. सुनंदा आमोणकर, डॉ. विश्वजीत फळदेसाई तसेच इतर डॉक्टर व अधिकारी उपस्थित होते.