थावरचंद गेहलोत कर्नाटकरचे नवे राज्यपाल
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
एकीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची चर्चा सुरू असतानाच मंगळवारी केंद्र सरकारने आठ नव्या राज्यपालांच्या नियुक्त्यांची घोषणा केली आहे. कर्नाटकाच्या राज्यपालपदी वाजूभाई वाला यांच्याजागी आता विद्यमान केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत येणार आहेत. याशिवाय गोव्याचे माजी विधानसभा अध्यक्ष आणि ज्येष्ठ भाजप नेते राजेंद्र अर्लेकर यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती होणार आहे. तर आणखी एक ज्येष्ठ भाजप नेते बंडारू दत्तात्रय यांना हरियाणाचे राज्यपालपद दिले गेल्याची घोषणा करण्यात आली आहे. नवी नावे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्वरित संमती दिल्याचे स्पष्ट करण्यात आले.
याशिवाय भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य हरीबाबू कंभामपती यांना मिझोरामचे राज्यपाल नियुक्त करण्यात आले. ते आंध्र प्रदेशातील विशाखापट्टण मतदारसंघाचे माजी खासदार आहेत. तर गुजरातमधील भाजपनेते मांगूभाई छगनभाई पटेल यांची मध्यप्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे.
काही राज्यपालांच्या बदल्या
मिझोरामचे विद्यमान राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लाई यांची बदली गोव्याचे राज्यपाल म्हणून करण्यात आली आहे. तर हरियाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांना त्रिपुराचे राज्यपाल करण्यात आले आहे. त्रिपुराचे विद्यमान राज्यपाल आणि छत्तीसगडमधील ज्येष्ठ भाजप नेते रमेश बैस यांची बदली झारखंडचे राज्यपाल म्हणून करण्यात आली. बंडारू दत्तात्रय यांची बदली हिमाचल प्रदेशमधून हरियाणाचे राज्यपाल म्हणून करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली.
सर्व नव्या राज्यपालांच्या कालावधीचा प्रारंभ त्यांनी त्यांचा नवा पदभार स्वीकारल्यानंतर होणार आहे, असे राष्ट्रपती भवनातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले. अनेक राज्यपाल लगेचच पदभार स्वीकारतील.