तीन-चार दिवसापासून खड्डे मुजवण्याच्या कामास वेग
प्रतिनिधी/ सातारा
जिल्हा शासकीय रूग्णालयात तब्बल आठ-नऊ वर्षांनी डांबरीकरणाला मुहूर्त मिळाला आहे. सातारा नगरपालिकेच्या बांधकाम विभागातून परवानगी मिळाली असून रूग्णालयाच्या फंडातून हे काम करण्यात येत आहे. गेल्या चार दिवसांपासून रूग्णालयाच्या परिसरातील खड्डे मुजवण्याचे काम सूरू आहे. संपूर्ण परिसरात डांबरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती इंजिनियअर सचिन नलवडे यांनी दिली आहे.
जिल्हा शासकीय रूग्णालयात गेल्या अनेक वर्षापासून रस्ता कि खड्डे हे कळायला मार्ग उरला नव्हता. रूग्णालयाच्या प्रवेशद्वारातून आत येताच वाहनधारकांची कसरत सूरू व्हायची. काही ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली होती. तर खड्डे कंबरडे मोडत होते. अस्थाव्यस्थ पार्किंगमुळे पार्किंग व्यवस्था मोडून पडली आहे. या समस्यांकडे गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्ष करण्यात आल्याने डांबरकरणाअभावी रस्ते गायब झाले होते. या डांबरीकरणाच्या कामाला गेल्या चार दिवसापासून सुरूवात झाली होती. रूग्णालयाच्या आवारात पडलेले खड्डे मुजवण्यात येत आहेत. प्रवेशद्वारात खड्डीकरण करण्यात आले आहे. दिवसभर रूग्णालयात येणाऱया रूग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून टप्प्याटप्याने काम सुरू आहे. नऊ वर्षाने डांबरीकरण करण्यात येत असल्याने परिसरात या कामाची चांगलीच चर्चा रंगली आहे. 26 लाख रूपयांचे हे काम आहे. जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या फंडातून हे काम करण्यात येत आहे. याला सातारा नगरपालिकेच्या बांधकाम विभागातून परवानगीही मिळाली असल्याची माहिती इंजिनिअर सचिन नलवडे यांनी दिली.