सेनिटायझर्स, मास्क, औषधांचे वाटप
प्रतिनिधी / फोंडा
केंद्रिय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी रविवारी सकाळी आडपई गावाला भेट देऊन येथील परिस्थितीचा आढावा घेतला. आडपई गावात कोरोनाबाधीत रुग्ण सापडल्याने या पार्श्वभूमिवर त्यांनी ही भेट घेऊन आरोग्य खात्याच्या डॉक्टरांशी त्यासंबंधी फोनवर चर्चा करुन खबरदारीसंबंधी आवश्यक त्या सूचना केल्या.
ग्रामस्थांसाठी सेनिटायझर्स, फेसमास्क तसेच प्रतिकारशक्ती वाढविणाऱया गोळय़ांचे यावेळी त्यांनी वितरण केले. आडपई-दुर्भाट पंचायतीच्या सरपंच सरोज नाईक तसेच इतर पंचसदस्यांच्या उपस्थितीत त्यांनी हे साहित्य वितरीत केले. स्थानिक पंचसदस्य तसेच गावातील स्वयंसेवकांमार्फत पंचायत क्षेत्रातील घरोघरी हे साहित्य वितरीत केले जाणार आहे.
आयुषमंत्री श्रीपाद नाईक हे मूळ आडपई गावातील असून आपल्या राजकीय कारकिर्दिची सुरुवात सरपंच म्हणून त्यांनी आडपई गावातूनच केली. सन 1994 ते 1999 पर्यंत ते येथील स्थानिक आमदार होते. खासदार म्हणून ते उत्तर गोव्याचे प्रतिनिधित्त्व करीत असले तरी आडपई गावाशी त्यांचे अजूनही दृष्ढ नाते आहे. गावात कोरोनाबाधीत रुग्ण सापडला म्हणून ग्रामस्थांनी भयभित न होता जास्त खबरदारी घ्यावी लागेल. तसेच ग्रामस्थांनी संसर्गबाधा रोखण्यासाठी सध्या ज्या स्वयंस्फूर्तीने घरीच थांबण्याचा निर्णय घेतलेला तो योग्य आहे. अशीच एकजूट दाखवित आरोग्य खात्याच्या सर्व नियमांचे पालन केल्यास कोरोना संसर्गाचा फैलाव रोखता येईल, असे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले आहे. यावेळी सरपंच सरोज नाईक, उपसरपंच सद्गुरु गावडे, पंचसदस्य मशाल नाईक, राजेश नाईक, निलेश तारी, जयराज नाईक, सचिव सर्वेश नाईक, भाजपा कार्यकर्ते प्रशांत नाईक, ग्रामस्थ सोमेश नाईक, खोर्लीचे सरपंच शिवा नाईक आदी उपस्थित होते.
मंत्री श्रीपाद नाईक यांनी फोंडा उपजिल्हा इस्पिळाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास कुवेलकर यांच्याशी फोनवर संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला. आडपई गावातील वयस्क नागरिकांची फोंडा उपजिल्हा इस्पितळात मोफत तपासणी करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले. त्यानुसार आज सोमवारी सायं. 4 वा. ही तपासणी होणार आहे. अग्नीशामक दलाच्या सहकार्याने संपूर्ण गावात जंतूनाशक फवारणीही करण्यात आली.