कामावर 25 लाख रुपये खर्च : दोन वर्षांच्या आतच रस्त्याची दुर्दशा : ग्रामस्थ आक्रमक
प्रतिनिधी / मालवण:
आडारी ढोलमवाडी ते न्हिवे बॅकवर्ड क्लास हाऊस रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने त्याची चौकशी करण्याची मागणी कोळंब ग्रामस्थांतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे.
कोळंब ग्रामपंचायत-आडारी ढोलमवाडी ते न्हिवे बॅकवर्ड क्लास हाऊस रस्त्याचे डांबरीकरणाचे काम खासदार नारायण राणे यांनी उपलब्ध करून दिलेल्या 25/15 या निधीतून करण्यात आले आहे. काम केल्यानंतर काही महिन्यांतच रस्त्याला खड्डे पडून डांबर गायब झाले. त्याची पाहणी करून रस्त्याचे काम दर्जेदार करावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
दोन वर्षांच्या आतच डांबर वाहून गेले
खासदार स्थानिक क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत 2018-19 खासदार नारायण राणे यांच्या सूचनेनुसार आडारी ढोलमवाडी ते न्हिवे बॅकवर्ड क्लास हाऊस रस्ता नूतनीकरण व डांबरीकरण करण्यासाठी प्रशासकीय मान्यता 24 डिसेंबर 2018 रोजी देण्यात आली होती. यासाठी 24.97 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. हे काम 20 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करून जुलै 2019 रोजी पूर्ण करण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडीच्या मार्गदर्शनाखाली हे काम ठेकेदारामार्फत पूर्ण करण्यात आले होते. यासाठी दोन वर्षे दोष निवारण कालावधी निश्चित करण्यात आला आहे. यामुळे दोन वर्षांच्या आतच रस्त्याचे डांबर वाहून गेल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे.
पर्यायी रस्ता म्हणून महत्व
कोळंब पूल दुरुस्तीवेळी आचरा, हडी, कोळंब ग्रामस्थांना पर्यायी मार्ग म्हणून आडारी ढोलमवाडी ते न्हिवे बॅकवर्ड क्लास हाऊस रस्ता महत्वाचा होता. कोळंब पूल वर्षभर बंद राहिल्यामुळे ग्रामस्थांना वाहतूक करण्यासाठी हा पर्यायी मार्ग फायद्याचा ठरला होता. मात्र, आता पुन्हा या रस्त्याची दुर्दशा झाल्याने ग्रामस्थ पुन्हा आक्रमक बनले आहेत.