कराड पोलिसांची कारवाई, बोगसगिरीची व्याप्ती वाढणार
प्रतिनिधी/ सातारा
कराड तालुक्यातील नारायणवाडी येथे ‘पंत क्लिनिक’ नावाचा दवाखाना चालविणारी बोगस डॉक्टर महिलेला बुधवारी अटक केल्यानंतर ख़ळबळ उडाली होती. आरोग्य सेवेतील या बोगसगिरीची व्याप्तू वाढत चालली असून आता त्याच दवाखान्यात रूग्णांवर उपचार केलेल्या आणखी एका बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी या डॉक्टरला पोलीस उपनिरीक्षक रेखा दुधभाते यांच्या पथकाने ताब्यात घेतले. सुदर्शन विष्णू जाधव (रा. रेठरे खुर्द, ता. कराड) असे अटक केलेल्या बोगस डॉक्टरचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, काले विभागात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यातच रुग्णांच्या मृत्युचे प्रमाणही जास्त आहे. आरोग्य विभागाला शंका आल्यामुळे याबाबतची माहिती घेतली असता कोरोना बाधित रुग्ण नारायणवाडीतील पंत क्लिनिकमधून उपचार घेत असल्याचे समोर आले. संबंधित दवाखान्याची माहिती आरोग्य विभागाने घेतली. त्यावेळी सुवर्णा प्रताप मोहिते (रा. रेठरे खुर्द) ही महिला त्या दवाखान्यात रुग्णांवर उपचार करीत असल्याचे समजले. संबंधित महिला डॉक्टर नाही. मात्र, तरीही ती रुग्णांवर उपचार करीत होती. आरोग्य विभाग व पोलिसांच्या संयुक्त पथकाने बुधवारी त्याठिकाणी छापा टाकून रुग्णांवर उपचार करताना सुवर्णा मोहिते या बोगस महिला डॉक्टरला ताब्यात घेऊन अटक केली. तसेच याच दवाखान्याच्या माध्यमातून सुदर्शन जाधव हाही रुग्णांवर उपचार करीत होता, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे. सुदर्शन जाधव हा फार्मासिस्ट असल्याचे सांगत आहे. मात्र, त्याबाबतही पोलिसांना संशय आहे. त्याच्यावरही पोलिसांनी गुन्हा दाखल करून शुक्रवारी त्याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक रेखा दुधभाते या प्रकरणाचा तपास करीत आहेत.