मंत्रिमंडळातील सहकाऱयाचा तडकाफडकी राजीनामा
कोलकाता / वृत्तसंस्था
एकीकडे ममता बॅनर्जी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी तयारी करत असताना दुसरीकडे बंडखोर नेत्यांचा सामना करावा लागत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळातील आणखी एका सहकाऱयाने शुक्रवारी त्यांना ‘राम-राम’ ठोकला. पश्चिम बंगालमधील वनमंत्री रजीब बॅनर्जी यांनी राजीनामा दिला असला तरी आपल्या पवित्र्यामागील कारण त्यांनी स्पष्ट केलेले नाही. पक्ष सोडून जाणाऱयांनी बिनधास्त जावे, असे खडे बोल ममतांनी सुनावल्यानंतर तृणमूल काँग्रेसमधील सदर नेत्याने राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
रजीब बॅनर्जी यांनी ममता बॅनर्जींना पत्र पाठवून राजीनाम्याची माहिती दिली आहे. राज्य सरकारमधून राजीनामा देणारे रजीब बॅनर्जी तिसरे मंत्री आहेत. रजीब बॅनर्जी यांनी पक्षातील काही नेते आपल्याविरोधात प्रचार करत असल्याची तक्रार केल्याच्या दुसऱया दिवशीच राजीनामा दिला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांनी सरकार आणि पक्षाच्या विरोधात अनेकदा अप्रत्यक्षपणे टीका केली होती. “पक्षातील काही ज्येष्ठ नेते कार्यकर्त्यांचे शोषण करत आहेत. काही कार्यकर्त्यांचा वापर करत माझ्याविरोधात खोटा प्रचार केला जात आहे,’’ असा गौप्यस्फोट रजीब बॅनर्जी यांनी अलीकडेच फेसबुक लाईव्हमध्ये केला होता. मात्र, हा आरोप करताना त्यांनी कोणाचेही नाव स्पष्टपणे उघड केले नव्हते.