मोईन अलीकडून अष्टपैलू खेळाची अपेक्षा
मुंबई / वृत्तसंस्था
लागोपाठ विजय मिळवणाऱया चेन्नई सुपरकिंग्सचा संघ आज कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आणखी एकदा विजयश्रीवर शिक्कामोर्तब करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. केकेआरचा संघ सध्या झगडत असून याचा लाभ घेण्याचा धोनीसेनेचा प्रयत्न असणार आहे. ही लढत सायंकाळी 7.30 पासून खेळवली जाणार आहे.
मागील वर्षी नामुष्कीजनक कामगिरी करणाऱया चेन्नईला यंदा दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सलामी लढतीत 7 गडय़ांनी आणखी एक पराभव पत्करावा लागला. पण, त्यानंतर धोनीने अनुभव पणाला लावत आपल्या संघसहकाऱयांकडून उत्तम कामगिरी करवून घेतली आहे. दीपक चहरच्या भेदक गोलंदाजीने चेन्नईला पंजाबविरुद्ध या हंगामातील पहिला विजय मिळवून दिला. मोईन अली व सॅम करण हे देखील उत्तम योगदान देण्यात यशस्वी ठरत आले आहेत.
अष्टपैलू मोईन अलीने तिसऱया स्थानी फलंदाजीला उतरताना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 24 चेंडूत 36, पंजाब किंग्सविरुद्ध 31 चेंडूत 46 व सोमवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध 20 चेंडूत 26 धावांचे 3 तडाखेबंद डाव साकारले. याशिवाय, त्याची ऑफस्पिन गोलंदाजी देखील उपयुक्त ठरत आली आहे. मागील सामन्यात 189 धावांचा पाठलाग करताना जोस बटलरने तडाखेबंद खेळी साकारली होती. मात्र, रविंद्र जडेजाच्या गुडलेंग्थ चेंडूने यष्टी उद्ध्वस्त केल्यानंतर त्या सामन्याचा नूर बदलला होता. त्यानंतर धोनीने दोन्ही बाजूंनी अली व जडेजा यांची गोलंदाजी लावत मास्टरस्ट्रोक काय असतो, याची प्रचिती दिली होती.
एकीकडे, जडेजाने एकाच षटकात धोकादायक बटलर व शिवम दुबेचे बळी टिपले तर अलीने डेव्हिड मिलर, रियान पराग, ख्रिस मॉरिस यांना अवघ्या 7 धावांमध्येच तंबूचा रस्ता दाखवला. युवा अष्टपैलू सॅम करणने फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर समयोचित योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. तीच अपेक्षा धोनीसेनेची येथे पुन्हा एकदा असेल.
प्रतिस्पर्धी संघ
केकेआर ः इयॉन मॉर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, शुभमन गिल, नितीश राणा, टीम सेफर्ट, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, कुलदीप यादव, शिवम मावी, लॉकी फर्ग्युसन, पॅट कमिन्स, कमलेश नागरकोटी, संदीप वॉरियर, प्रसिद्ध कृष्णा, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, शकीब अल हसन, शेल्डॉन जॅक्सन, वैभव अरोरा, हरभजन सिंग, करुण नायर, बेन कटिंग, वेंकटेश अय्यर, पवन नेगी.
चेन्नई सुपरकिंग्स ः महेंद्रसिंग धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सुरेश रैना, अम्बाती रायुडू, केएम असिफ, दीपक चहर, डेव्हॉन ब्रेव्हो, फॅफ डय़ू प्लेसिस, इम्रान ताहीर, एन. जगदीशन, कर्ण शर्मा, लुंगी एन्गिडी, मिशेल सॅन्टनर, रविंद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकुर, सॅम करण, जोश हॅझलवूड, आर. साई किशोर, रॉबिन उत्थप्पा, मोईन अली, कृष्णप्पा गौतम, चेतेश्वर पुजारा, एच. हरिशंकर रेड्डी, के. भगत वर्मा, सी. हरी निशांत.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 पासून.
मॉर्गनसमोर नेतृत्वातील कौशल्य सिद्ध करण्याचे आव्हान
दोन वर्षांपूर्वी इंग्लंडला पहिलावहिला वर्ल्डकप जिंकून देण्यात यशस्वी ठरलेल्या मॉर्गनकडे यंदा केकेआरचे पूर्णवेळ कर्णधारपद असणार आहे. मागील हंगामाच्या मध्यातच दिनेश कार्तिककडील धुरा मॉर्गनकडे सोपवली गेली होती. साहजिकच, आता मॉर्गनसमोर या छोटेखानी क्रिकेट प्रकारात आपल्या नेतृत्वाचे कौशल्य सिद्ध करण्याचे आव्हान असणार आहे. मुंबई इंडियन्स व आरसीबीविरुद्ध पराभव पत्करावे लागल्यानंतर मंगळवारच्या सामन्यापूर्वी या संघाची पाचव्या स्थानापर्यंत घसरण झाली होती. वास्तविक, त्या दोन्ही लढतीत केकेआरची स्थिती उत्तम होती. पण, याचे त्यांना विजयात रुपांतर करुन घेता आले नाही.
आरसीबीविरुद्ध वरुण चक्रवर्तीने विराट कोहली व रजत पाटीदार यांना केवळ 5 चेंडूतच बाद केल्यानंतर केकेआरने त्यांना 2 षटकात 2 बाद 9 असे खिंडीत पकडले होते. पण, मॉर्गनने आश्चर्यकारकरित्या वरुण चक्रवर्तीची गोलंदाजी थांबवली आणि शकीब हसनला गोलंदाजीवर आणले. मॅक्सवेल व एबीडी यांनी त्याचा त्यावेळी चांगलाच लाभ घेतला आणि यामुळे आरसीबीला 4 बाद 204 धावांची मजल सहजपणे गाठता आली होती.
आजच्या लढतीत मॉर्गन पुन्हा शकीबला गोलंदाजीला आणणार की ऑस्ट्रेलियन अष्टपैलू बेन कटिंगला तैनात करणार, हे पहावे लागेल. या तिन्ही सामन्यात मॉर्गनने पहिले षटक अनुभवी हरभजनकडे सोपवले. मात्र, कुलदीप यादव अधिक सरस पर्याय ठरु शकतो, अशी याच संघातील गोटात कुणकुण आहे. मुख्य प्रशिक्षक ब्रेन्डॉन मॅक्युलमने आरसीबीविरुद्ध पराभवानंतर यापूर्वीच संघात काही बदल करणार असल्याचे संकेत दिले आहेत. सलामीवीर ऋतुराज गायकवाड 5, 5 व 10 अशा किरकोळ धावांसह खराब फॉर्ममध्ये असून त्याला पुन्हा संधी दिली जाणार का, हे पहावे लागेल. धोनी मात्र सातत्याने बदल करण्यासाठी अनुकूल मानला जात नाही.