आयपीएल : केकेआरविरुद्ध आज लढत
वृत्तसंस्था/ अबु धाबी
स्फोटक फलंदाजी लाईनअप आणि घातक गोलंदाजीच्या बळावर शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध होणाऱया आयपीएलमधील सामन्यात मुंबई इंडियन्सची बाजू वरचढ ठरणार आहे. हा सामना सायंकाळी 7.30 पासून सुरू होणार आहे.
विद्यमान विजेत्या असलेल्या मुंबई इंडियन्सने आतापर्यंत जबरदस्त प्रदर्शन केले असून गेले चार सामने त्यांनी जिंकले आहेत. अशी स्थिती असल्याने मुंबई आपल्या संघात कोणताही बदल करण्याची शक्यता नाही. याउलट केकेआरसमोर मात्र अनेक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. याआधीच्या सामन्यात केकेआरला कोहलीच्या आरसीबी संघाकडून 82 धावांनी नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागला आहे. केकेआरसाठी त्यांचा प्रमुख फिरकी गोलंदाज सुनील नरेन या सामन्यात खेळू शकेल की नाही, हा प्रश्न उभा राहिला आहे. त्याच्या गोलंदाजीच्या शैलीवर पंचांनी आक्षेप घेतल्याने त्याला खेळवायचे की नाही, याचा निर्णय केकेआरला घ्यावा लागणार आहे. त्याच्या वादग्रस्त ऍक्शनचा मुद्दा लवकर निकालात लागेल अशी अपेक्षा त्यांनी केली होती. पण तसे न झाल्यामुळे आरसीबीविरुद्धचा सामना त्याला हुकला होता. तो या सामन्यात खेळू न शकल्यास मुंबईला शेख झायेद स्टेडियमवर चांगली संधी असेल, असे म्हणता येईल. या मैदानावर त्यांचा कर्णधार रोहित शर्माने दोन अर्धशतके झळकवली आहेत.
रोहितला (216) लय सापडल्यास तो कोणत्याही आक्रमणावर तुफान हल्ला करू शकतो, विशेषतः केकेआरविरुद्ध खेळताना तो जास्त आक्रमक होताना दिसला आहे. या दोघांत झालेल्या आधीच्या सामन्यात रोहितने 80 धावांची खेळी करीत मुंबईला 49 धावांनी विजय मिळवून दिला होता. शर्माशिवाय मुंबईची आघाडी व मध्यफळीही चांगल्या फॉर्ममध्ये आहे. डी कॉक (191) व सूर्यकुमार यादव (233 धावा) हाच जोम कायम ठेवण्याचा शुक्रवारी प्रयत्न करतील. याशिवाय इशान किशननेही (186 धावा) आरसीबीविरुद्ध धडाकेबाज 99 धावांची खेळी करीत आपली क्षमता दाखवून दिली आहे. मात्र चांगली सुरुवात केल्यानंतर त्याचे मोठय़ा खेळीत रूपांतर करण्याची कला त्याला साध्य करण्याची गरज आहे. हार्दिक पंडय़ा व पोलार्ड यांनी प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर जो हल्ला चढवलाय त्यावर प्रशिक्षक महेला जयवर्धने खुपच खुश झाले आहेत. त्यांना कृणाल पंडय़ाचीही पूरक साथ मिळाली आहे. या तिघांची क्षमता पाहिल्यास ते केकेआरच्या गोलंदाजीच्या चिंधडय़ा उडवतील, विशेषतः सुनील नरेनच्या गैरहजेरीत, अशी शक्यता वाटते.
गोलंदाजीच्या विभागातही मुंबईची लाईनअप स्थिरावली असून बोल्ट व बुमराह त्यांना लवकर यश मिळवून देत आहेत. जेम्स पॅटिन्सनकडून त्यांना पूरक साथ मिळत असून या तिघांनी मिळून आतापर्यंत 31 बळी मिळविले आहेत. राहुल चहर व कृणाल हे फिरकी गोलंदाज केकेआरच्या फलंदाजांना रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील. दरम्यान, केकेआरचा सर्वात मोठा दुर्गुण ठरलाय तो म्हणजे फलंदाजांच्या कामगिरीतील सातत्याचा अभाव, विशेषतः आंद्रे रसेलची कामगिरी. त्याला सात सामन्यात केवळ 71 धावा जमविता आलेल्या आहेत. त्याला बढती देण्याची चर्चा झाली होती. पण तो नेहमीप्रमाणे खालच्या क्रमांकावरच फलंदाजीस येत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आपल्या क्षमतेला तो पुरेसा न्याय देऊ शकलेला नाही.
केकेआरकडेही कोणत्याही गोलंदाजीला शरणागती पत्करावयास लावणारे फलंदाज आहेत, त्यात युवा शुभमन गिल, इयॉन मॉर्गन, नितिश राणा, कर्णधार दिनेश कार्तिक यांचा समावेश आहे. मात्र एखाद-दुसरा सामना सोडल्यास त्यांना फारशी अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. शुक्रवारच्या सामन्यात त्यांची एकसंध कामगिरी होईल, अशी अपेक्षा संघव्यवस्थापन करीत आहे. त्यांच्या गोलंदाजांनी मात्र काही निसटते विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
संघ : मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), तरे, अनमोलप्रीत सिंग, अनुकुल रॉय, लीन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक व कृणाल पंडय़ा, इशान किशन, पॅटिन्सन, बुमराह, जयंत यादव, पोलार्ड, मॅक्लेनाघन, मोहसिन खान, कोल्टर नाईल, प्रिन्स बलवंत राय, डी कॉक, राहुल चहर, सौरभ तिवारी, रुदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, बोल्ट.
केकेआर : दिनेश कार्तिक (कर्णधार), मॉर्गन, राणा, त्रिपाठी, रिंकू सिंग, गिल, लाड, अली खान, नागरकोटी, कुलदीप, फर्ग्युसन, कमिन्स, पी.कृष्णा, संदीप वॉरियर, मावी, वरुण चक्रवर्ती, रसेल, ग्रीन, एम.सिद्धार्थ, सुनील नरेन, निखिल नाईक, बँटन.
सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.