अमीर खानच्या ‘दंगल’ चित्रपटातील झायरा वसीम ही अभिनेत्री आजही अनेकांना आठवत आहे. या चित्रपटामुळे तिला न भूतो न भविष्यती अशी प्रसिद्धी मिळाली. तथापि, नंतर महिलांनी चित्रपटात कामे करणे अमान्य असणाऱया धर्मवाद्यांचा तिच्यावर दबाव आला आणि तिने चित्रपट संन्यास घेतला. धर्माच्या आज्ञेनुसार आपण चित्रपट क्षेत्र सोडत आहोत, असे तिने स्पष्ट केले.
अशाच प्रकारची पण काहीही वेगळी घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. येथील फारूखाबाद जिल्हय़ातील नाझ फातिमा हिला राज्यातील पहिली महिला बस चालक व्हायचे होते. तिने बस ड्रायव्ंिहंग शिकण्यासाठी कानपूर येथील केंद्रात नाव घालण्याची इच्छाही व्यक्त केली होती. उत्तर प्रदेश सरकारच्या कौशल्य विकास अभियानाअंतर्गत बस ड्रायव्हिंग शिकण्यासाठी ज्या 27 युवतींची निवड करण्यात आली होती, त्यांच्यात तिचाही समावेश होता. तिने मार्च मध्ये डेमो वर्गात भागही घेतला. मात्र आंतरराष्ट्रीय महिला दिनी सुरू झालेल्या प्रशिक्षण वर्गात ती पोहचू शकली नाही. एक दुर्घटना घडल्यामुळे ती प्रशिक्षण घेऊ शकणार नाही असे प्रारंभी सांगण्यात आले. तथापि, धर्मवाद्यांच्या दबावामुळेच तिला आपल्या महत्वाकांक्षेला आवर घालावा लागला असे बोलले जात आहे. चित्रपटात अभिनय करणे आणि बस चालविण्याची महत्वाकांक्षा बाळगणे या दोन बाबी समान नाहीत. तथापि, महिलांना अशा महत्वाकांक्षा पूर्ण करू न देणे ही प्रवृत्ती या दोन्ही घटनांमध्ये समान आहे. सोशल मिडियावरून यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.