वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रकुलसाठी निवडण्यात आलेल्या खेळाडूंपैकी भारताची आणखी एक खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने तिला स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले आहे. महिलांच्या 4ƒ100 मी. रिले संघातील ही धावपटू आहे.
तिची उत्तेजक चाचणी पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले असले तरी पदाधिकाऱयांनी तिचे नाव सांगण्याचे टाळले आहे. ‘राष्ट्रकुलसाठी जाणाऱया महिला रिले संघातील एक सदस्य उत्तेजक चाचणीत दोषी आढळली आहे. त्यामुळे तिला स्पर्धेतून माघार घ्यावी लागणार आहे,’ असे एका वरिष्ठ पदाधिकाऱयाने सांगितले. मात्र त्याने दोषी खेळाडूचे नाव उघड केले नाही. एका सदस्याच्या माघारीमुळे रिले संघात आता फक्त चारच सदस्य राहिले आहेत. यापैकी एखादी खेळाडू जखमी झाल्याने उपलब्ध असलेल्या एका धावपटूला त्यात भाग घ्यावे लागणार आहे. यामुळे संघाच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो.
भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनने (एएफआय) 37 सदस्यांचे ऍथलेटिक्स पथक जाहीर केले त्यात दुती चंद, हिमा दास, श्रावणी नंदा, एनएस सिमी, एस. धनलक्ष्मी, एमव्ही जिलना यांचा समावेश केला होता. केवळ 36 सदस्यांचा कोटा जाहीर झाल्याने यापैकी जिलनाला माघार घ्यावी लागली. पण तिला नंतर धनलक्ष्मीच्या जागी स्थान देण्यात आले होते. धनलक्ष्मीही उत्तेजक चाचणीत दोषी आढळली होती. याआधी धनलक्ष्मीसह ऐश्वर्या या उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्या होत्या तसेच पॅराऍथलीट अनीश कुमार व पॉवरलिफ्टर गीता हेही दोषी आढळले आहेत.