मंत्री माविन गुदिन्हो यांचा सवाल, कुठ्ठाळीच्या भाजप उमेदवारीसाठी गिरीष पिल्लेवर भर
प्रतिनिधी /वास्को
दाबोळीचे आमदार व राज्याचे मंत्री माविन गुदिन्हो यांनी कुठ्ठाळीच्या भाजपा उमेदवारीबाबत आपले मन मोकळे केले आहे. कुठ्ठाळीसाठी उमेदवार शोधायची गरज नाही. सांकवाळचे सरपंच गिरीष पिल्ले हे भाजपाशीच एकनिष्ठ असल्याने त्यांना उमेदवारी का देण्यात येऊ नये, आम्ही सर्व भारतीय एक असताना आणखी किती काळ आतले व बाहेरचे करीत बसणार असा प्रश्न मंत्री माविन गुदिन्हो यांनी केला आहे. कुठ्ठाळीत गिरीष पिल्ले यांचे स्थान बळकट असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मंगळवारी संध्याकाळी दाबोळीतील भाजपाच्या नवेवाडेतील कार्यालयाला केंद्रीय पर्यटनमंत्री जी किशन रेड्डी यांनी भेट दिली. त्यांच्या भेटीनिमित्त कार्यालयातील हॉलमध्ये छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीयमंत्री जी किशन रेड्डी यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांबरोबरच गोव्यात स्थायीक झालेले मुळ आंद्र प्रदेशचे नागरिकही यावेळी उपस्थित होते. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मंत्री माविन गुदिन्हो यांच्यासह माजी आमदार सिध्दार्थ कुंकळ्ळीकर, जिल्हा पंचायत सदस्य अनिता थोरात, नगरसेवक दीपक नाईक, सुदेश भोसले, विनोद किनळेकर, अमेय चोपडेकर, सरपंच सॅबी परेरा, माजी नगरसेवक दाजी साळकर, दाबोळी भाजपा मंडळ अध्यक्ष संदीप सुद, गोवा आंद्रा संघटनेचे पदाधिकारी व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री माविन गुदिन्हो यांनी अनेक वर्षांपासून मुळ तेलगु नागरीक गोव्यात एकरूप होऊन वागत असून या राज्याशी त्यांनी चांगले संबंध ठेवलेले आहेत. गोव्याच्या माध्यमातून ते देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी योगदान देत आहेत असे स्पष्ट करून तेलगू बांधवांचे कौतुक केले. याचवेळी मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले की एरव्ही आपण सर्वांशी सारखे वागत असतो. मात्र, निवडणुका येताच आतील व बाहेरील असा भेदभाव सुरू होतो. त्यांच्याकडे वोट मागताना असा प्रश्न येत नाही. असे का होते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सर्व भारतीय एकसमान असताना आतील बाहेरील हा भेदभाव का केला जातो. हे योग्य आहे का असे ते म्हणाले. मुळ भारतीय नागरीक असलेल्या कमला हॅरीस अमेरीकेचा पदभार सांभाळू शकतात. तर इथे भेदभाव का केला जातो. जी माणसे इथेच जन्मली, मोठी झाली, त्यांना मुले झाली, त्यांच्या मुलांनाही मुले झाली, जे गोव्याचेच म्हणून वागतात तरी त्यांच्या आडनावावरून त्यांना बाहेरचे म्हणायचे का असाही प्रश्न मंत्री गुदिन्हो यांनी केला. हा भेदभाव गैर असल्याचे ते म्हणाले व कुठ्ठाळीच्या भाजपा उमेदवारीचा विषय त्यांनी काढला. कुठ्ठाळीत आज भाजपाकडे उमेदवार दिसत नाही. कुणाचे नाव पुढे आलेले नाही. अशा वेळी कुठ्ठाळीत सांकवाळचे सरपंच गिरीष पिल्ले सारखे नौजवान नेते भाजपाकडे आहेत. त्यामुळे भाजपाला उमेदवार शोधायची गरज नाही. आणखी किती काळ आपण आतला व बाहेरचा असे तेच तेच बोलत राहणार. पिल्ले यांचे भाजपाकडे मजबुत संबंध आहेत. अधिकाअधिक मते खेचण्याची क्षमता आहे. परंतु आपण पक्षाने गिरीष पिल्ले यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी करीत नाही. परंतु त्यांना उमेदवारी का दिली जाऊ नये असे आपले मत असल्याचे ते म्हणाले. मंत्री माविन गुदिन्हो यांचा कुट्ठाळीच्या उमेदवारीसाठी सरपंच गिरीष पिल्ले यांच्या नावावरच अधिक भर असल्याचे या कार्यक्रमाव्दारे दिसून आले आहे. विशेष म्हणजे केंदीयमंत्री जी किशन रेड्डी यांच्यासाठी मंत्री माविन गुदिन्हो यांनी हे भाषण सफाईदार हिंदीतून केले.