सध्या सरासरीपेक्षा 20 इंच जादा पाऊस
प्रतिनिधी / पणजी
गुरुवारी पावसाने पुन्हा राज्याला झोडपून काढले. गेल्या 24 तासात पणजीत 4 इंच पावसाची नोंद झाली. 36 तासात 6.50 इंचाची नोंद झाली आहे, तर मौसमात राज्यभरात पडलेला एकूण पाऊस आता 895 मि. मी. म्हणजेच 35.74 इंच झाला आहे. सरासरीपेक्षा तो 20 इंच जादा आहे. आगामी 48 तासांत राज्यात मुसळधार पाऊस पडेल असा इशारा पणजी वेधशाळेने दिला आहे.
गुरुवारी 18 जून क्रांतीदिनी देखील पावसाने झोडपून काढले. पणजीत 65 मि. मी. एवढी नेंद गेल्या 12 तासात झाली. बुधवारी सायंकाळी उशिरा पावसाने जोर वाढविला व तो रात्रभर कोसळत होता. पहाटे पुन्हा मुसळधार पावसाने संपूर्ण गोव्याला झोडपून काढले.
मुसळधार पावसाने राज्यातील वार्षिक सरासरी ओलांडली आहे. त्यापेक्षा 20 इंच पाऊस आतापर्यंत जादा झाला आहे. पुढील 48 तासामध्ये पावसाचा जोर आणखी वाढला जाणार आहे. तसेच पावसाबरोबरच जोरदार वादळी वारे वाहतील असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यात मान्सून अधिकच सक्रिय झालेला आहे. जोरदार पडणाऱया पावसामुळे राज्यात पूरसदृष्य स्थिती निर्माण झालेली आहे. राज्यातील सर्व प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. हवामान खात्याने सायंकाळी जारी केलेल्या पत्रकानुसार 22 जूनपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. वादळी वाऱयाचा वेग ताशी 60 मि. मी. पर्यंत जाऊ शकतो.
गेल्या 24 तासात सर्वांधिक पाऊस मुरगाव येथे झाला असून तिथे 5.50 इंच, पेडणे 5 इंच, दाबोळी 4.50 इंच, पणजी 4 इंच, सांखळी, वाळपई, काणकोण व मडगाव येथे प्रत्येकी 2.50 इंच तर म्हापसा व केपे येथे प्रत्येकी 2 इंच, सांगे येथे 1.50 इंच पावसाची नोंद झालेली आहे. बंगालच्या खाडीतून आंध्र ते तेलंगण, कर्नाटकमार्गे पावसाचा मोठा पट्टा थेट गोव्याच्या दिशेने पुढे सरकत असल्याने आगामी 4 दिवसात धारवाड, हुबळी बेळगावसह गोवा, कोकण, कोल्हापूर, सांगली आदी भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.