अद्याप तीन जणांचा अहवाल येणे बाकी
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना विषाणूची लागण झाल्याच्या संशयाने काही जणांच्या रक्ताचे नमुने बेंगळूरच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. सोमवारी त्यामधील पाच जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यामुळे बेळगावसाठी हे दिलासादायक आहे. अजून तीन जणांचा अहवाल येणे बाकी असून तो मंगळवारी येण्याची शक्मयता व्यक्त करण्यात आली.
संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये हाहाकार माजविलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावमध्येही संशयितांचे रक्त तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्या सर्वांच्या रक्ताचे नमुने बेंगळूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. आतापर्यंत 21 जणांच्या रक्ताचे नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यामधील 18 जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्हय़ामध्ये सर्व ती दक्षता आरोग्य विभागाने घेतली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बाहेरून आलेल्या संशयित रुग्णांच्या रक्तांचे नमुनेही तपासण्यात आले आहेत. आतापर्यंत बेळगावमध्ये एकही रुग्ण आढळला नाही. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने घेतलेल्या दक्षतेबद्दल जनतेतूनही समाधान व्यक्त होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर बेळगावकरांनीही त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे केली आहे.
जिल्हा प्रशासनाने कोरोना संशयितांसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वॉर्ड तयार केला आहे. कोणीही संशयित आढळल्यास त्या वॉर्डमध्ये दाखल करण्यात येत आहे. त्यानंतर तातडीने त्यांच्या रक्ताचे नमुने पाठविण्यात येत आहेत. सोमवारपर्यंत पाठविलेल्या अहवालानुसार एकाही व्यक्तीला कोरोनाची लागण झाली नाही. आता केवळ तीन रुग्णांचा अहवाल येणे बाकी आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी दिली.
जिल्हय़ात 383 जण निरीक्षणाखाली…
जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार 383 जण निरीक्षणाखाली आहेत. 217 जणांवर 14 दिवसांसाठी क्वारंटाईन पद्धतीने उपचार करण्यात आले आहेत. 8 जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. 126 जणांची आतापर्यंत क्वॉरंटाईन उपचारपद्धत संपली आहे. तर 28 दिवसांची क्वारंटाईन पद्धत संपलेल्यांची संख्या 32 आहे. जे संशयित होते त्यांच्यावर आरोग्य विभागाने वेळोवेळी उपचार केले आहेत. आयएमए हॉलमधील फ्लू कॉर्नर विभागात सोमवारी सकाळपासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत 112 जणांची तपासणी करण्यात आली.