जातीय तेढ निर्माण करणाऱया मेसेजवर पोलिसांची करडी नजर
प्रतिनिधी / सिंधुदुर्ग:
जिल्हा रुग्णालयातून शनिवारी आणखी सहा नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्याचे अहवाल येणे बाकी आहे. आतापर्यंत जिल्हा रुग्णालयाने 62 नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षामध्ये 21 रुग्ण दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रत्नागिरी येथे कोरोना पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णासोबत रेल्वेच्या डब्यातून प्रवास केलेल्या जिल्हय़ातील व्यक्तींचा शोध घेण्यात आला असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांचा स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.
जिल्हय़ात 375 व्यक्तींना घरीच विलगीकरण करण्यात आले असून संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये 51 व्यक्ती आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत शनिवारी 1990 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.
तेढ निर्माण करणारे मजकूर पाठवणाऱयांवर कारवाई
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर धर्मामध्ये, जातीय तेढ निर्माण होईल, असे कोणतेही संदेश, फोटो अगर व्हीडिओ व्हॉट्सऍप, फेसबूक, ट्वीटर, टिकटॉक, इन्स्ट्राग्राम आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केल्यास संबंधित व्यक्तीवर तसेच ग्रुप ऍडमिनवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सर्व सोशल मीडिया पोस्टवरील संदेशांवर पोलीस विभागाचे लक्ष असून कोणताही आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करू नये, अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिल्या आहेत. जिल्हय़ात संचारबंदी असतानाही विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱयांवर 10 गुन्हे दाखल करण्यात आले असून 17 वाहने जप्त करण्यात आली आहेत.