प्रशासनाला प्रतीक्षा अहवालाची
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव जिल्हय़ातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. गेल्या 24 तासांत 128 जणांचे स्वॅब संकलित करून तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठविण्यात आले असून जिल्हा प्रशासनाला तपासणी अहवालाची प्रतीक्षा आहे.
शहरातील वेगवेगळय़ा वसतिगृहांमध्ये व अशोकनगर येथील ईएसआय हॉस्पिटलसह वेगवेगळय़ा ठिकाणी ठेवण्यात आलेल्या संशयितांचे स्वॅब तपासणीचे काम सोमवारी रात्रीपर्यंत सुरू होते. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
सोमवारी सायंकाळी जिल्हा सर्वेक्षण विभागाने जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे. जिल्हय़ातील 1694 जणांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले असून 266 जणांना 14 दिवसांच्या होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर विलगीकरण कक्षात 20 जणांवर उपचार करण्यात येत आहेत.
जिल्हय़ातील 393 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी 17 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 248 जणांचे निगेटिव्ह आले आहेत. आणखी 128 जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. 647 जणांनी 14 दिवसांचा तर 761 जणांनी 28 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला आहे.