नवी दिल्ली / वृत्तसंस्था
टी-20 क्रिकेट प्रकारातील आपली कौशल्ये आणखी विकसित करण्यासाठी दिनेश कार्तिक सध्या मुंबईत आपला मित्र अभिषेक नायरच्या मार्गदर्शनाप्रमाणे सराव करत असून आणखी किमान 3-4 वर्षे खेळण्याचा मानस त्याने व्यक्त केला. आयपीएल लिलाव आपल्या प्राधान्यक्रमावर नसल्याचा दावा केला असला तरी लिलावासाठी उपलब्ध खेळाडूत त्याचा समावेश आहे.
36 वर्षीय दिनेश कार्तिकने 2019 वनडे वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये भारतीय संघातर्फे शेवटचे प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर मात्र तो मुख्य प्रवाहातून बाहेर फेकला गेला. वर्ल्डकपला दोन वर्षांचा कालावधी लोटून गेला असला तरी दिनेश कार्तिकने पुनरागमनाची अपेक्षा सोडून दिलेली नाही. मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारात आपण आणखी 3-4 वर्षे निश्चितपणाने खेळू शकतो, असा त्याचा होरा आहे.
भारतीय यष्टीरक्षक-फलंदाजांमध्ये आयपीएल प्रँचायझींना बरेच स्वारस्य असते. त्या पार्श्वभूमीवर, आयपीएलमध्येही त्याला आणखी एकदा भरभक्कम करार लाभू शकेल. आजवर या दिग्गज खेळाडूने आयपीएलमध्ये चक्क 6 प्रँचायझींचे प्रतिनिधीत्व केले. मात्र, घरचा संघ असलेल्या चेन्नईत त्याला अद्याप एकदाही स्थान मिळू शकलेले नाही. तो केकेआर प्रँचायझीकडून सर्वाधिक खेळला आहे.
‘टी-20 क्रिकेट हे आताही माझ्यासाठी स्टार्टिंग पॉईंट आहे. आयपीएलसारखी स्पर्धा यात महत्त्वाची ठरते. आयपीएल स्पर्धेच्या माध्यमातून जागतिक स्तरावरील सर्वोत्तम खेळाडूंविरोधात भिडता येते आणि आपली कौशल्ये दाखवण्यासाठी ते उत्तम व्यासपीठ असते. मध्यफळीत मी उत्तम योगदान देऊ शकतो’, असे दिनेश कार्तिकने येथे नमूद केले.
वर्ल्डकपची अपयशी मोहीम दिनेश कार्तिकला मुख्य प्रवाहातून बाहेर घेऊन गेली. मात्र, 36 वर्षीय शिखर धवन, पाकिस्तानचा शोएब मलिक, अलीकडेच निवृत्त झालेला मोहम्मद हाफीज यांचा त्याच्यासमोर आदर्श आहे.
‘फॉर्म, तंदुरुस्ती व अनुभव हे घटक निवडीसाठी महत्त्वाचे असतात. शोएब मलिक व मोहम्मद हाफीज हे थकले भागलेले खेळाडू देखील टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानसाठी लक्षवेधी योगदान देण्यात यशस्वी ठरले. मी स्वतः विविध स्पर्धांनंतर कामगिरीच्या निकषावर स्वतःचे योगदान कसे होते, याचे विश्लेषण करत असतो. अगदी अलीकडे विजय हजारे चषक स्पर्धेनंतर मी अनेकांशी माझ्या कामगिरीबद्दल संवाद साधला होता’, याचा त्याने शेवटी उल्लेख केला.