प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हय़ातील रूग्णसंख्येत सतत वाढ होत असताना कोरोनातून बरे होणाऱयांचे प्रमाणही वाढत आहे. जिल्हा रूग्णालयात उपचार घेणाऱया आणखी 5 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. या सर्वाना शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, गुरूवारी सायंकाळनंतर आणखी 17 अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. यात 12 नवे रूग्ण असून त्यातील एका महिलेचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्हयातील कोरोनाबाधीतांची संख्या 125 झाली आहे.
जिल्हा रूग्णालयातून शुक्रवारी आणखी 5 जणांना डिस्चार्ज मिळाल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 38 झाली आहे. शुक्रवारी घरी सोडलेल्यांमध्ये संगमेश्वर तालुक्यातील चौघांचा तर रत्नागिरीतील एकाचा समावेश आहे. यामध्ये कळंबुशीमधील 1, माखजनमधील 2, फुणगुसमधील 1 आणि रत्नागिरी झाडगांवमधील एका व्यक्तीचा समावेश आहे. संगमेश्वरमधील चौघांचेही अहवाल 10 मे रोजी पॉझीटीव्ह आढळले होते. तर रत्नागिरीतल झाडगावमधील महिलेचा अहवाल 11 रोजी पॉझीटीव्ह आला होता.
गुरूवारी रात्री प्रशासनाला प्राप्त अहवालांपैकी 17 अहवाल पॉझीटीव्ह आले आहे. मात्र यामध्ये 5 जुन्या रूग्णांच्या दुसऱया अहवालांचा समावेश असून 12 नवे रूग्ण आहेत. यामधील एका महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण रूग्णांची संख्या 125 झाली आहे. नव्या रूग्णांमध्ये खेड तालुक्यातील 4, राजापुरात कशेडीमधील 2, गुहागरमधील जांभारी व पांगरी वेळंबमधील प्रत्येकी एक, चिपळूणमधील नारदखेरकी, रत्नागिरीतील करबुडे, दापोलीतील बोरीवली व संगमेश्वरातील माळवशी येथील प्रत्येकी एका रूग्णांचा समावेश आहे. यातील चिपळुणमधील नारदखेरकी येथील महिलेचा मृत्यू झाला आहे.
खेडमधील रूग्णसंख्या 16
खेडः खेड तालुक्यात आणखी 4 नवे रूग्ण सापडल्याने तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 16 झाली आहे. नव्या रूग्णांमध्ये कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात कार्यरत असलेल्या भरणे-बाईतवाडीतील 36 वर्षी सहाय्यक आरोग्यसेविकेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चिंतेत भर पडली आहे. त्याचबरोबर कुळवंडी, भेलसई आणि कळंबळी हंबीरवाडी येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे.
कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात कार्यरत असलेल्या सहाय्यक आरोग्य सेविकेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे कळताच अन्य आरोग्य कर्मचाऱयांच्या उरात धडकी भरली आहे. संपर्कातील व्यक्तींचा शोध जारी करण्यात आला आहे.
मुंबईतील कुर्ला येथून 17 मे रोजी चालत आलेल्या कुळवंडीतील 29 वर्षीय तरूणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गावात आल्यावर त्याला तत्काळ कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले होते.
चेंबूर येथून 17 मे रोजी चालत आलेला कळंबणी-हंबीरवाडी येथील रहिवासी कोरोनाबाधित आढळला आहे. ही व्यक्ती कळंबणी उपजिल्हा रूग्णालयातील संस्थात्मक कक्षात असल्याने संपर्काची शक्यता कमी आहे.
मुंबईतून 16 मे रोजी भेलसई चौथाई वरचीवाडी येथे आलेल्या व्यक्तीचा अहवालही पॉझीटीव्ह आला आहे. लक्षणे दिसू लागल्याने कामथे रूग्णालयात दाखल करून त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यापुर्वी याच गावात 58 वर्षीय युवक 9 मे रोजी पॉझीटीव्ह आढळला होता.
कोरेगाव, वरवलीत कन्टेन्मेंट झोन जाहीर
तालुक्यातील कोरेगाव-बेलवाडी व वरवली-धुपेवाडी येथील दोन युवक कोरोनाबाधीत झाल्याने दोन्ही गाव कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले आहेत. वरवली-धुपेवाडीतील युवकाच्या संपर्कातील 11 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.