191 अहवाल निगेटिव्ह, विलगीकरण विभागात 14 जणांवर उपचार
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहर व जिल्हय़ात कोरोनाचा फैलाव थोपविण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना सुरू ठेवल्या आहेत. शुक्रवारी रात्री आणखी 59 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून एकूण 65 जणांचे अहवाल प्रयोगशाळेतून यायचे आहेत. दरम्यान, सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण विभागात चौदा जणांवर उपचार करण्यात येत आहेत.
शनिवारी सायंकाळी जिल्हा सर्वेक्षण विभागाने मीडिया बुलेटिन प्रसिद्ध केले असून यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. संपूर्ण जिल्हय़ात 1567 जणांच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले आहे. 255 जणांना चौदा दिवसांच्या होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.
जिल्हय़ातील 626 जणांनी चौदा दिवसांचा व 672 जणांनी 28 दिवसांचा होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला असून आतापर्यंत 266 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यामध्ये दहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 191 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. प्रशासनाला अद्याप 65 तपासणी अहवालांची प्रतीक्षा आहे.
दरम्यान, सिव्हिल हॉस्पिटलमधील फ्लू कॉर्नरमध्ये तपासणीसाठी येणाऱया रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. व्यापक जनजागृतीमुळे थंडताप, सर्दी, खोकला ही लक्षणे दिसून आली तरी लोक भीतीने फ्लू कॉर्नरमध्ये आपली तपासणी करून घेताना दिसत आहेत. ज्या रुग्णामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून येतात अशांची स्वॅब तपासणी करण्यात येत आहे.