पुणे / प्रतिनिधी :
जैवविविधतेने संपन्न असलेल्या वातावरणाचा सुखद अनुभव एकीकडे, तर अतिक्रमणांमुळे कच-याच्या सान्निध्यात झुळझुळणा-या नदीचे रूप दुसरीकडे असा विविधांगी अनुभव घेत पुण्यातील हौशी आणि निष्णात छायाचित्रकारांच्या नजरेतून राम नदीचा प्रवास आज उलगडला.
निमित्त होते यंदाच्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त राम नदी परिसरात आयोजित फोटो वॉकचे. किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त राम नदी पुनरुज्जीवनासाठी सात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, फोटो वॉक हा त्यापैकीच एक कार्यक्रम होता. यावेळी अनिल गायकवाड, सचिन पुणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या फोटो वॉकमध्ये सुमारे 75 निष्णात आणि हौशी छायाचित्रकार सहभागी झाले होते. खाटपेवाडी येथून उगम पावणारी राम नदी पुढे भुकुम, भुगाव, बावधान, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी अशी प्रवाहीत होऊन मुळा नदीला जाऊन मिळते. किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत मार्च 2019 मध्ये राम नदी पुनरुज्जीवन मिशनचे उदघाटन करण्यात आले. या मिशनमध्ये पर्यावरण क्षेत्रात काम करणा-या आणि दीर्घ अनुभव असलेल्या पुण्यातील 13 स्वयंसेवी संस्था सहभागी झाल्या आहेत.
भूगावमधील रामनदीच्या किनारी असलेल्या वाघजाई मंदिरापासून या फोटोवॉकचा प्रारंभ झाला. अजूनही तिथे असलेल्या जैवविविधतेचा अनुभव छायाचित्रकारांनी आपल्या कॅमे-यात टिपला. सोमेश्वर मंदिर येथे या फोटोवॉकचा समारोप झाला.
राम नदीची सद्यस्थिती पाहण्यासाठी या फोटो वॉकचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण आणि शहरी भागातील अतिक्रमणांचा फटका राम नदीला बसला आहे. खाटपेवाडी ते बावधान या ग्रामीण भागातून सुमारे 19.2 किलो मीटरचे अंतर वाहणारी ही नदी पुढे पुणे मनपा क्षेत्रातही प्रवाहीत होते.
या फोटोवॉक दरम्यान छायाचित्रकारांनी काढलेल्या निवडक छायाचित्रांमधून परीक्षांनी निवडलेल्या छायाचित्रांना किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सांगता समारंभात पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.