प्रतिनिधी/ सातारा
सरकारतर्फे सध्या 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्यासाठी नुकताच हिरवा कंदील दाखविला आहे. पण यासाठी ऍप अंतर्गत ऑनलाईन बुकिंग करणाऱयांना लसीकरणासाठी परवाणगी देण्यात येते. संबंधीत वयोगटातील सातारकर नागरिकांनी ही ऑनलाईन बुकिंगला अधिक पसंती दिली आहे. पण मागील काही दिवसांपासुन बुकिंग फुल्ल असल्याचे दिसत असल्याने नागरिक मात्र चांगलेच हैरान झाले आहेत.
त्यातच शुक्रवार, शनिवार व रविवार रोजी लसीकरणच ठप्प होते. तसेच यादिवशी लसीकरणाच्या ऍपवर नोंदणीच होऊ शकली नाही, त्यामुळे नागरिकांनी सोमवारी रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. पण बुकिंगच फुल्ल दाखवत होते. तब्बल दोन दिवसांचे बुकिंग फुल्ल दाखविण्यात येत होते. तसेच त्यापुढील दिवसाचे बुकिंग करण्याकरीता पर्यायच उपलब्ध होत नव्हता.
या सर्व प्रकारांमुळे नागरिकांमध्ये चांगलीच नाराजी पसरत आहे. एकीकडे शासनातर्फे लसीकरण लवकरात लवकर करून घ्या असा सल्ला देण्यात येतो. पण दुसरीकडे मात्र लसच उपलब्ध होत नाही. तसेच खासगी रूग्णालयात लसीकरण करून घ्यावे म्हटल्या दि. 15 नंतर लस उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येते. आता लस घ्यायची तरी कशी असा सवाल नागरिक करत आहेत.