प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यास प्रारंभ झाला असून सर्वाधिक लसीकरण झालेल्या राज्यांमध्ये देशात कर्नाटक आघाडीवर आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 1,38,656 जणांना लस देण्यात आली आहे. त्यापैकी काही जणांनाच लसीचा प्रतिकूल परिणाम जाणवला आहे. मात्र, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिले.
येथे पत्रकारांशी ते बोलत होते. राज्यात 1,36,882 जणांना कोव्हिशिल्ड तर 1,774 जणांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आली आहे. त्यापैकी 2 ते 3.5 टक्के जणांनाच लसीचा डोस दिल्यानंतर त्रास झाला आहे. 8,47,908 जणांनी लसीसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी 3,27,201 सरकारी व 4,45,389 जण खासगी आरोग्य कर्मचारी आहेत. एकूण 7,72,591 आरोग्य कर्मचारी असून आघाडीच्या फळीत 75,318 जण आहेत. दुसऱया टप्प्यात राज्यातील दीड ते 2 कोटी जणांना लस देण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.